महासंचालक कार्यालय : शिस्तभंगाच्या कारवाईची तंबी यवतमाळ : आपल्या कामांसाठी पोलीस महासंचालक कार्यालयातील कार्यासन अधिकारी, त्यांच्या लिपिकांना भेटलात तर खबरदार, तुमच्यावर शिस्तभंगाची कारवाई करू, असा इशारा महाराष्ट्र पोलीस दलातील तमाम अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिला आहे. राज्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक (आस्थापना) अतुलचंद्र कुलकर्णी यांनी ४ आॅगस्ट २०१४ रोजी यासंबंधी लेखी फर्मान जारी केले आहे. राज्य पोलीस दलातील अधिकारी-कर्मचारी हे त्यांच्या पदोन्नती, अपिल प्रकरणे, सेवा ज्येष्ठता, बदली, विभागीय चौकशी, गोपनीय अहवाल व इतर अडचणींसाठी सतत मुंबईत पोलीस महासंचालक कार्यालयात भेटी देतात. तेथे ते कार्यासन अधिकारी, त्यांच्या अधिनस्त लिपिकवर्गीय यंत्रणेला भेटतात. मात्र या पुढे सदर कक्ष अधिकारी, लिपिकांना आपल्या अडचणींसाठी कुणीही भेटू नये, तसे आढळल्यास शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असे या आदेशात नमूद आहे. अडचणी असल्यास पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी महासंचालक कार्यालयातील थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून आपल्या समस्यांचे निराकरण करावे, असेही अतुलचंद्र कुलकर्णी यांनी निर्देशित केले आहे. महासंचालक कार्यालयात कनिष्ठ यंत्रणेकडून चालणाऱ्या ‘चिरीमिरी’च्या कारभाराला चाप बसविण्यासाठी हा निर्णय घेतला गेल्याचे सांगितले जाते. (प्रतिनिधी)
कक्ष अधिकारी, लिपिकांना भेटण्यास पोलिसांना मनाई
By admin | Updated: September 30, 2014 23:41 IST