लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : लासीना जंगलातील पोलीस फायरिंग रेंजवर रविवारी सकाळी ७.३० वाजता सराव सुरू करण्यापूर्वी रायफल साफ करताना जमादाराच्या हाताला गोळी लागली. त्यांना तातडीने उपचारासाठी खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. अभय वासुदेव कोकुलवार (५२) रा. पोलीस मुख्यालय, असे जखमी जमादाराचे नाव आहे. लासीना येथील पोलीस फायरिंग रेंजवर प्रशिक्षणार्थ्यांसह शस्त्रागारातील आरमोरर अभय कोकुलवार पोहोचले. सराव सुरू करण्यापूर्वी त्यांनी एके-४७ रायफल साफ करण्यासाठी हातात घेतली. दरम्यान, या रायफलीमध्ये अडकलेला एक राऊंड फायर झाला. ती गोळी कोकुलवार यांच्या उजव्या हाताच्या पंजाला छेदून निघाली. या घटनेने खळबळ निर्माण झाली. पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना तातडीने रूग्णालयात दाखल केले. कोकुलवार यांच्या हाताची जखम गंभीर असल्याने त्यावर प्लास्टिक सर्जरीची आवश्यकता असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. नंतर त्वरीत कोकुलवार यांना नागपूर येथील एका खासगी रूग्णालयात हलविण्यात आले. या घटनेमुळे फायरिंगचा सराव थांबविण्यात आला आहे.
रायफलीतून गोळी सुटून पोलीस जमादार जखमी
By admin | Updated: May 29, 2017 00:48 IST