पुसद : येथील छत्रपती शिवाजी चौकातील राहुटीवजा पोलीस चौकी एका वेडसर महिलेच्या चुकीमुळे जळून खाक झाल्याची घटना बुधवारी घडली. पुसद शहर पोलीस स्टेशनच्यावतीने येथील वर्दळीच्या छत्रपती शिवाजी चौकाच्या वाशिम मार्गावर राहुटीवजा पोलीस चौकी आहे. या चौकीने बुधवारी अचानक पेट घेतला. याच वेळी वाऱ्याची झुळूक आल्याने आगीने चांगलाच पेट घेतला. त्यातच वेळी या परिसरातील नागरिकांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आग विझविण्यास मदत केली. त्यामुळे या चौकीच्या आजूबाजूला उभी असलेली वाहने व या भागातील दुकाने बचावली. अन्यथा मोठी हानी घडली असती, असे येथील प्रत्यक्षदर्शी नागरिकांचे म्हणणे आहे. याबाबत हकीकत अशी की, एक वेडसर भिक्षेकरू महिला या परिसरात कागद, काडीकचरा नेहमीच पेटवत असते. बुधवारी तिने असाच उपक्रम करीत चौकीच्या पाठीमागे लागूनच काडीकचरा पेटविला. आणि चौकीला आग लागल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. सुर्दैवाने या आगीत इतर कुठलीही हानी झाली नसली तर पोलीस चौकीचा तंबू मात्र जळून खाक झाला. यावेळी चौकीत कोणतेही कागदपत्रे व कर्मचारी नव्हता, हे विशेष. आग लागल्याचे पाहून वेडसर महिलेने घटनास्थळावरुन पलायन केले. (प्रतिनिधी)
वेडसर महिलेने जाळली पोलीस चौकी
By admin | Updated: October 28, 2016 02:07 IST