नाल्या तुंबल्या : नगरपरिषद प्रशासनाचे दुर्लक्ष, शहरातील मैदानांना विळखा उमरखेड : मोकळ्या मैदानासह रस्ते, नाल्या सध्या प्लास्टिकमय झाल्याचे चित्र उमरखेड शहरात दिसत आहे. मानवासह पर्यावरणालाही धोका पोहचविणाऱ्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी असतना शहरात त्याचा खुलेआम वापर होत आहे. त्यामुळे शहरात प्लास्टिक बंदीचा फज्जा उडाल्याचे दिसत आहे. नगरपरिषदेचे अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होताना दिसत आहे.प्लास्टिक पिशव्यामुळे पर्यावरण प्रदूषित होत आहे. नागरिकांच्या ही शरीरावरही विपरित परिणाम होत आहेत. हा प्रकार थांबविण्यासाठी प्लास्टिक पिशव्यांचा वापर बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्यानुसार राज्यात ५० मायक्रॉनपेक्षा जाडीच्या प्लास्टिक पिशव्याचा वापर करण्यावर बंदी लादण्यात आली. मात्र या बंदीचा सर्वत्र फज्जा उडाल्याचे दिसून येत आहे. अद्याप पातळ प्लास्टिक पिशव्याचा वापर बेधडकपणे सुरूच असल्याचे चित्र दिसून येत आहे. याबाबतचा आदेश फेब्रुवारी २०१५ मध्ये राज्य सरकारच्या पर्यावरण विभागाने निर्गमितही केला. मात्र तरीही सर्रास प्लास्टिक पिशव्याचा वापर सुरूच आहे. किरकोळ व धाऊक विक्रेत्याकडून त्याचा वापर अद्याप सुरुच आहे. मात्र त्याच्या विरुद्ध कारवाई झाल्याचे कधीच ऐकिवात नाही. उमरखेड नगरपरिषदही उदासीन आहे. त्यामुळे विक्रेते निर्ढावलेले आहे. ग्राहक ही घरुन कापडी पिशवी घेऊन जात नसल्याने त्याचे आयतेच फावत आहे. ग्राहक मागतात म्हणून आम्ही प्लास्टिक पिशव्या त्यांना देतो असे दुकानदार सांगतात. परिणामी आता दोनही बाजूने जागृती करण्याची गरज आहे. शहरात व बाहेर तर हवा आली की शेकडो प्लास्टिक पिशव्या उडत येतात. त्या नष्ट होत नसल्याने प्रदूषणातही वाढ होते. कमी जाडीच्या पिशव्याची परप्रांतातून राज्यात मोठ्या प्रमाणात आवक होते. त्यावर कुणाचाच अंकुश नाही. (शहर प्रतिनिधी)
उमरखेडमध्ये प्लास्टिक बंदीचा फज्जा
By admin | Updated: June 11, 2016 02:55 IST