दाव्यास टाळाटाळ : वाहनाला अपघातप्रकरण यवतमाळ : एचडीएफसी जनरल इन्शुरन्स कंपनीने वाहनधारकाला विमा दाव्याची रक्कम सव्याज द्यावी, असा आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंचाने दिला आहे. बोरीअरब येथील पवन भगवतीप्रसाद पांडे यांनी दाखल केलेल्या तक्रारीवर मंचच्या अध्यक्ष अॅड. आश्लेषा दिघाडे, सदस्य डॉ. अशोक सोमवंशी यांनी हा निर्णय दिला आहे. पवन पांडे यांच्या टाटा विस्टा या वाहनाला १७ मार्च २०१४ रोजी टायर फुटल्याने नागपूर येथे अपघात झाला. या वाहनाचा विमा असल्याने दाव्यासाठी पांडे यांनी सदर इन्शुरन्स कंपनीकडे अर्ज सादर केला. मात्र कंपनीने विमा दाव्याची रक्कम देण्यास टाळाटाळ सुरू केली. त्यामुळे त्यांनी जिल्हा ग्राहक न्यायालयात धाव घेतली. पांडे यांचे वाहन घरगुती वापरासाठी आहे मात्र त्यांनी घटनेच्या दिवशी ते भाड्याने दिले होते, त्यामुळे विमा दावा देता येणार नाही, अशी बाजू इन्शुरन्स कंपनीने मांडली. मात्र सदर वाहन मित्राला कुठल्याही भाड्याशिवाय देण्यात आल्याची बाब न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान सिद्ध झाली. त्यामुळे न्यायालयाने आपल्या निर्णयात एचडीएफसी जनरल इन्शुरन्स कंपनी नागपूरने पांडे यांना विमा दाव्यापोटी चार लाख ३४ हजार ५४८ रुपये आणि त्यावर १० टक्के व्याज द्यावे, असा आदेश दिला. शिवाय वाहनाच्या दुरुस्तीपर्यंत गॅरेज पार्किंगचा खर्च एक लाख, आर्थिक, मानसिक व शारीरिक त्रासापोटी दहा हजार आणि तक्रारीचा खर्च पाच हजार रुपये द्यावा, असे या आदेशात म्हटले आहे. (वार्ताहर)
एचडीएफसी इन्शुरन्सला ग्राहक न्यायालयाचा दंड
By admin | Updated: January 15, 2017 01:16 IST