शेतकरी काळजीत : पाऊस गायब, उर्वरित पेरण्या खोळंबल्या, संकट संपता संपेनादारव्हा : गेल्या आठ दिवसांपासून पावसाचा थेंबही न पडल्याने तालुक्यातील ५० हजार हेक्टरवरील पीक संकटात सापडले आहे. वातावरणात कोणताही बदल होताना दिसत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. दोन दिवसात पुरेसा पाऊस न पडल्यास दुबार पेरणीचे संकट ओढवले जाण्याची भीती व्यक्त केल्या जात आहे.दारव्हा तालुक्यात ६६ हजार ३३५ हेक्टर पेरणीयोग्य क्षेत्र आहे. त्यापैकी जवळपास ५० हजार हेक्टरवर पेरणी झाली. पावसाचा खंड पडल्याने उर्वरित क्षेत्रातील पेरण्या खोळंबल्या आहे. विशेषत: सोयाबीनची पेरणी बाकी असल्याचे सांगितले जात आहे. यावर्षी मान्सून चांगला राहील असा अंदाज वर्तविण्यात आल्यानंतर मान्सूनपूर्व कपाशीची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली. जूनच्या मध्यान्हात बऱ्यापैकी पाऊस झाल्याने ज्या शेतकऱ्यांनी तयारी करून ठेवली होती त्यांनी पेरण्या आटोपून घेतल्या. त्यानंतर १७ ते २२ जूनदरम्यान पाऊस झाल्याने पेरण्या चांगल्या साधल्या. परंतु २३ जूननंतर पावसाने दडी माल्याने कोवळे अंकुर मान टाकायला लागले आहे. ज्यांच्याकडे सिंचनाची सुविधा आहे ते कसेबसे पाणी देऊन पीक जगविण्याचा प्रयत्न करीत आहे. पण पाणी किती दिवस पुरेल याची शाश्वती नाही. कारण आतापर्यंत तालुक्यात एकूण २१२ मिमी पाऊस पडला आहे. जमिनीतील पाण्याची पातळी वाढली नाही. त्यामुळे या पाण्याच्या भरवशावर जास्त दिवस राहता येणार नाही.आधीच शेतकऱ्यांवर जणू संकटाची मालिका सुरू आहे. गेल्या काही वर्षांपासून पीक स्थिती बरोबर नाही. त्यातच यावर्षी पीककर्जाच्या पुनर्गठनाची समस्या निर्माण झाली होती. परंतु अशाही परिस्थितीत शेतकऱ्यांनी कर्ज घेऊन खरीप हंगामासाठी तजवीज करून ठेवली होती. १४ जूनपासून पावसाला वेग आला. त्या काळात वातावरण चांगले दिसल्याने अनेकांनी पेरण्या आटोपल्या. त्यानंतर २० जूनला १५ मिमी, २१ जूनला ७९ मिमी पाऊस पडला. या पावसाने पिके निघाली. त्यानंतर पाऊस जणू गायबच झाला. उष्णता वाढल्याने पीक करपायला लागले आहे. पाऊस न आल्याने त्याचा दुष्परिणाम पिकांवर दिसायला लागले आहे. परंतु येत्या दोन-तीन दिवसात पाऊस् न आल्यास दुबार पेरणी शिवाय गत्यंतर राहणार नाही अशी परिस्थिती आहे.शेतकऱ्यांची काळजी सध्या संपता संपत नसल्याचे दिसून येते. गेल्या तीन वर्षांपासून जिल्ह्यात निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. यावर्षी तरी ही परिस्थिती बदलावी, यासाठी प्रार्थना सुरू आहे. तालुक्यात सध्या १५ हजार हेक्टरवरील पेरण्या पावसाअभावी खोळंबल्या गेल्या. वेळेत पाऊस न पडल्यास पेरणीला उशिर होईल. उशिरा पेरणी झालेल्या पिकाला चांगला अॅव्हरेज मिळत नाही. त्यामुळे पेरणी झालेले व पेरणी न झालेले असे दोन्ही बाजूचे शेतकरी अडचणीत सापडले आहे. (तालुका प्रतिनिधी)
५० हजार हेक्टर क्षेत्रातील पीक संकटात
By admin | Updated: July 1, 2015 00:26 IST