पाटणबोरी : पांढरकवडा तालुक्यात सर्वात मोठे गाव असलेल्या पाटणबोरी येथे अद्याप ग्रामीण रूग्णालय झाले नाही. त्यामुळे रूग्णांना वेळेवर योग्य उपचार मिळणे कठीण झाले आहे.पाटणबोरी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ वरील अत्यंत महत्त्वाचे गाव आहे. राष्ट्रीय महामार्गामुळे येथे अपघातातील रूग्ण मोठ्या प्रमाणात येतात. येथून चार किलोमीटर अंतरानंतर तेलंगणाची सीमा सुरू होते. त्यामुळे तेथील रूग्णही पाटणबोरीत येतात. सोबतच झरी तालुक्यातील पाटण तथा अर्ली परिसरातील रूग्णही येथे येतात. मात्र येथे केवळ प्राथमिक आरोग्य केंद्र असल्याने त्यांच्यावर उपचार करणे कठीण जाते. पाटणबोरी आरोग्य केंद्रांतर्गत परिसरात आठ उपकेंद्र आहे. त्या उपकेंद्रातील नियमित रूग्णही तपासणीकरिता येथेच येतात. ही आठही उपकेंद्रे मोठी आहे. त्यांना त्यांच्याच परिसरातील रूग्णांवर उपचार करणे कठीण जाते. त्यामुळे त्याचाही भार येथील आरोग्य केंद्रावर पडतो. येथे दोन पूर्णवेळ वैद्यकीय अधिकाऱ्यांची गरज आहे. सध्या दोनही अधिकारी कार्यरत आहे. ते येथेच वास्तव्य करतात. त्यामुळे थोडी स्थिती बरी आहे. सध्या येथील बाह्यरूग्णांची संख्याही प्रचंड वाढली आहे. त्यामुळे कार्यरत डॉक्टरांनाही ताण सहन करावा लागतो.येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा परिसर चांगलाच मोठा आहे. त्या परिसरात ग्रामीण रूग्णालयाची निर्मिती करणे शक्य आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांची निवासस्थानेसुद्धा तेथे बांधली जाऊ शकतात. मात्र तरीही येथे आरोग्य केंद्र निर्मितीचा गाडा रखडला आहे. पांढरकवडा तालुक्यात करंजीसारख्या कमी लोकसंख्येच्या गावात ग्रामीण रूग्णालय आहे. मात्र पाटणबोरी सर्वच अर्थाने मोठे गाव असूनही अद्याप येथे ग्रामीण रूग्णालय होऊ शकले नाही, हीच खरी शोकांतिका आहे. येथील लोकसंख्या जवळपास १५ हजारांच्या घरात आहे. परिसरातील २५ हजार नागरिक येथील आरोग्य केंद्राची सेवा घेतात. मात्र ग्रामीण रूग्णालय नसल्याने येथे अपघाताचे रूग्ण आल्यास त्यांना प्राथमिक उपचार करून पांढरकवडा अथवा यवतमाळला रेफर करावे लागते. येथे ग्रामीण रूग्णालय झाल्यास त्यांच्यावर वेळीच योग्य उपचार, शस्त्रक्रिया करणे शक्य होऊ शकते. त्यातून अनेकांचे प्राणही वाचू शकतात. ग्रामीण रूग्णालयात स्त्री रोग तज्ज्ञ राहात असल्याने महिलांनाही येथेच योग्य उपचार मिळेल. एक्स-रे, सोनोग्राफी, रक्त, लघवी तपासणी, शस्त्रक्रिया आदी सुविधा मिळू शकेल. त्यामुळे येथे ग्रामीण रूग्णालयाची निर्मिती करावी, अशी मागणी आहे. (वार्ताहर)
पाटणबोरीला रूग्णालयच नाही
By admin | Updated: May 26, 2016 00:08 IST