चिमुकल्यांचा सहभाग : कायमस्वरूपी घरकुलाची मागणीनेर : तालुक्यातील आजंती येथील पारधी बांधवांनी महिला व चिमुकल्यांसह शुक्रवारी सात किलोमीटरचे अंतर पायदळ तुडवून येथील तहसीलवर धडक दिली. कायमस्वरूपी घरकूल देण्याची मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली. आजंती येथे गावाबाहेरील सात हेक्टर ७३ आर. ‘ई’ क्लास जमिनीवर ५५ पारधी कुटुंब वास्तव्य करतात. ही जागा अतिक्रमित असल्याने अद्याप त्यांना घरकुलाचा लाभ मिळाला नाही. गावात गोमाता सभागृहात झालेल्या ग्रामसभेत त्यांनी घरकूल देण्याची मागणी केली होती. तसेच आम्हाला डोंगरावरून गावात आणा, अशी विनवणी केली होती. मात्र त्यांच्या मागण्यांकडे ग्रामसेभेने दुर्लक्ष केले. परिणामी सभा उधळली गेली. पारधी बांधव संतप्त झाले. यावरून वाद निर्माण झाला. त्यातून अखेर पारधी बांधवांवर गुन्हेही दाखल झाले होते.या सर्व बाबींमुळे संतापलेल्या पारधी बांधवांनी शुक्रवारी महिला व चिमुकल्यांसह सात किलोमीटरचे अंतर कापून येथील तहसील कार्यालय गाठले. या ठिकाणी समस्यांचा पाढा वाचला. गावकरी आम्हाला हातपंपावर पाणी भरु देत नाही, असे संघटनेचे अध्यक्ष मतीन पवार यांनी सांगितले. निवाऱ्याअभावी कुटुंबाचे हाल होत असून पारधी बांधवांची अद्याप ससेहोलपट सुरू आहे. ती थांबवावी, अशी मागणी समाजाचे नेते मतीन पवार, बबन पवार, चंदू राठोड, आतुशे पवार, खंजिरा घोसले, नास्वेर पवार, सूरज पवार, पेवकर पवार, रितुंभ पवार, सचित पवार, इन्या घोसले, सरस्वती पवार, अनडी पवावरसह शेकडो पारधी बांधवांनी केली. (तालुका प्रतिनिधी)
पारधी बांधव नेर तहसीलवर
By admin | Updated: September 24, 2016 02:35 IST