पुसद : उपविभागातील चारही तालुक्यात सर्दी, खोकला आणि तापाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात असून स्वाईन फ्ल्यूचा धसका प्रत्येकाने घेतल्याचे दिसत आहे. त्यातच पुसद व दिग्रस येथील महिलेचा स्वाईन फ्ल्यूने मृत्यू झाला. पुसद उपविभागातील दिग्रस, पुसद, महागाव व उमरखेड या चारही तालुक्यात विषम वातावरणामुळे आजाराचे प्रमाण वाढले आहे. ताप, खोकला, सर्दी, घसा दुखणे आदींचे लक्षण असणारे रुग्ण मोठ्या प्रमाणात आहेत. पुसदच्या उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. जे.एन. सूर्यवंशी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, १५ दिवसांपूर्वी विविध आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात रुग्णालयात दाखल झाले होते. अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे वातावरणात बदल झाला. त्यामुळे सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी आदींचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र नागरिकांनी घाबरून न जाता अशी काही लक्षणे आढळल्यास उपजिल्हा रुग्णालयात गोळ्या उपलब्ध आहेत. पाच दिवस सकाळ, संध्याकाळ याप्रमाणे दहा गोळ्या घेतल्यास अशा आजारावर मात करता येते. नागरिकांनी दररोज आपले हात चार ते पाच वेळा धुवून स्वच्छ करावे. तसेच सर्दी झाल्यास दिवसातून पाच ते सहावेळा मिठाचे मिश्रण असलेले कामट पाणी गुळणीसाठी वापरावे, असे डॉ. सूर्यवंशी म्हणाले.तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आशीष पवार म्हणाले, तालुक्यात सहा प्राथमिक आरोग्य केंद्र असून वातावरणातील बदलामुळे दररोज २० ते २५ रुग्ण सर्दी, ताप, खोकला आदी आजाराचे येत आहेत. मात्र आता उन्ह तापत असल्याने रुग्णांची संख्या रोडावली आहे. पुसदच्या उपजिल्हा रुग्णालयात स्वाईन फ्ल्यू कक्ष स्थापन करण्यात आल्याचे डॉ. पवार यांनी सांगितले. डॉ. अकिल मेमन व डॉ. राजेश चव्हाण म्हणाले, साधा फ्ल्यू हा स्वाईन फ्ल्यू असे शकतो. त्यासाठी नागरिकांनी घाबरून न जाता प्राथमिक काळजी घेणे गरजेचे आहे. नागरिकांनी शक्यतोवर गर्दी टाळावी, तोंडाला मास्क बांधावा, वारंवार हात धुणे गरजेचे असून रोगप्रतिकार शक्ती चांगली ठेवणे आवश्यक आहे. महागाव तालुक्यात सध्या सर्दी, ताप, खोकल्याचे रुग्ण असून स्वाईन फ्ल्यू प्रतिबंधक गोळ्या उपलब्ध असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. जब्बार पठाण यांनी ‘लोकमत’ला सांगितले. पुसदच्या उपजिल्हा रुग्णालयासह काही आरोग्य केंद्रात स्वाईन फ्ल्यूच्या गोळ्या उपलब्ध आहेत. (प्रतिनिधी)
साथीच्या आजाराचे थैमान
By admin | Updated: March 22, 2015 02:08 IST