वन विभाग सुस्त : घोन्सा जंगलात वावरवणी : घोन्सा परिसरातील घोन्सा खुल्या खाणीपासून वाहणाऱ्या विदर्भा नदीच्या तिरावर वाघाच्या पावलांचे ठसे शेतकरी व वेकोलि कर्मचाऱ्याना आढळून आले. त्यामुळे घोन्सा परिसरात पुन्हा वाघाची दहशत निर्माण झाली आहे.गेल्या सप्ताहात तालुक्यातील सैदाबाद (कायर) येथील एका युवकाला वाघाने ठार केले होते. त्यानंतर आता वाघाने आपला मोर्चा घोन्सा परिसराकडे वळविला आहे. घोन्सा येथील खुल्या कोळसा खाणीजवळील विदर्भा नदीच्या काठावर वाघाच्या पावलांचे ठसे अनेक कामगारांना खाणीत जाताना आढळून आले. त्यामुळे वेकोलि कर्मचाऱ्यांमध्ये वाघाची दहशत निर्माण झाली आहे. घोन्सा खुल्या खाणीजवळील परिसर घनदाट जंगलाने व्यापलेला आहे. त्यामुळे या परिसरात अनेकदा शेतकरी, शेतमजूर व कामगारांना वाघाचे दर्शन झाले आहे. वाघाच्या धास्तीने अनेक जण या परिसराकडे जातच नाही.त्यातच गेल्या पंधरवड्यात दहेगाव येथील महाकुलकर यांची गाय याच परिसरात वाघाने फस्त केली होती. त्याचबरोबर रासा येथील एका बैलाला वाघाने ठार केले होते. तेव्हापासून वाघाची दहशत कायमच आहे. रात्रीच्या वेळी तर वेकोलिचे कामगारही कामावर जाण्यासाठी घाबरत आहे. सैदाबाद येथील तरूणाला ठार केल्यानंतर वन विभागाने वाघाला त्वरित जेरबंद करू, असे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप वाघाचा बंदोबस्त झालाच नाही. (कार्यालय प्रतिनिधी)
वाघाच्या पावलांचे ठसे आढळल्याने दहशत
By admin | Updated: April 11, 2015 23:55 IST