लाडक्या लेकीचे लग्न थाटा-माटात व्हावे ही प्रत्येक मायबापाची अपेक्षा असते. यासाठी ते पैशाची जुळवाजुळव करतात. मात्र एका पित्याला मुलीच्या लग्नासाठी काढावयास लागलेल्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम लग्नाची तिथी जवळ येऊपर्यंत प्राप्त झाली नाही. पोलीस विभागातील एका बाबूच्या अडेलतट्टू धोरणामुळे अखेर त्या पोलीस असलेल्या बापाला आपल्या कन्येचा विवाह स्थगित करावा लागला. लाडखेड पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी राजेश्वर ना. राठोड (ब.नं.७०२) यांना कार्यालयीन खाबुगिरीचा प्रचंड फटका बसला. त्यांची मुलगी किरण हिचा विवाह २२ जून रोजी सकाळी ११.१० मिनिटांनी दारव्हा येथे शिवलॉन येथे आयोजित करण्यात आला होता. मुलीच्या लग्नासाठी त्यांनी भविष्य निर्वाह निधीतून चार लाख रुपये मिळविण्यासाठी अर्ज केला होता. अर्जासोबत मुलीची लग्नपत्रिका, मुलीचे शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र व भविष्य निर्वाह निधीची पावती जोडली होती. मात्र त्यांना विवाहाची तारीख जवळ येईपर्यंत रक्कम मिळू शकली नाही. यासंदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षकांना राजेश्वर राठोड यांनी भविष्यनिर्वाह निधीचे पैसे मिळाले नाही तर लग्न मोडण्याची शक्यता आहे, अशी विनंती फॅक्सद्वारे केली होती. २७ मे रोजी अर्ज केल्यानंतरही लग्नाची तिथी जवळ येईपर्यंत कर्जाची रक्कम न मिळाल्यामुळे राजेश्वर राठोड पूर्णत: हादरले. यासंदर्भात विशेष पोलीस महानिरीक्षकाकडेही अर्ज करण्यात आला. मात्र कर्जाशी संबंधित असलेल्या एका बाबूच्या अडेलतट्टू धोरणामुळे सदर रक्कम मिळाली नसल्याचे राठोड यांनी सांगितले. माझी स्वत: भेट घ्या, असा आग्रह त्या बाबूने केल्यामुळे व त्याची राजेश्वर राठोड यांनी भेट न घेतल्यामुळे कर्ज प्रकरण प्रलंबित ठेवल्याचे सांगण्यात येते. एका पोलीस कर्मचाऱ्याच्या कन्येचे भविष्य यापद्धतीने सुळावर चढविण्याचा प्रयत्न करण्यात आला. दरम्यान लग्न पैशाअभावी स्थगित करावे लागत आहे, ही विनवणी वराकडील मंडळींना वधू मंडळीकडून करण्यात आली. वधू मंडळीची विवंचना लक्षात घेऊन वर पक्षाने अत्यंत सामंजस्याने निर्णय घेऊन दिवाळीत लग्न करण्यासाठी होकार दिला. भविष्य निर्वाह निधीतून एखाद्याचे भविष्य कसे उद्ध्वस्त होऊ शकते, हे यातून सिद्ध झाले असून पोलीस विभागातील खाबूगिरीबाबत मात्र संताप व्यक्त होत आहे.
खाबुगिरीमुळे पोलीस कन्येचे भविष्य सुळावर पांडुरंग भोयर - सोनखास
By admin | Updated: July 3, 2014 23:46 IST