जिल्हा बँक : सर्वाधिक थकीत शेतकरी महागाव तालुक्यातरितेश पुरोहित महागाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पुसद विभागीय शाखेअंतर्गत ११७ सहकारी संस्थांचे ३४ हजार २२१ सभासद थकीत कर्जदार आहेत. त्यांच्याकडे १२६ कोटी ३३ लाख रुपये थकित असून, ६५ कोटी ८० लाख १७ हजार रुपये व्याजाचेच आहेत. सर्वाधिक थकबाकीदार शेतकरी महागाव तालुक्यात आहेत. यामुळे खरीप हंगामाच्या तोंडावर कर्ज पुनर्गठन न झाल्याने शेतकरी आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेत आहेत. नैसर्गीक आपत्ती आणि शासन व बँकांचे कर्ज वितरण धोरणाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. यातून शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर वाढत आहे. पुसद विभागीय जिल्हा मध्यवर्ती बँकेअंतर्गत ३० एप्रिल २०१५ पर्यंत थकीत असलेल्या शेतकऱ्यांची आकडेवारी थक्क करणारी आहे. नैसर्गीक आपत्तीने शेतकरी कर्जाची परतफेड करू शकले नाही. त्यामुळे व्याज वाढत गेले. सध्य स्थितीत थकित रकमेत निम्म्यापेक्षा अधिक व्याजाचीच रक्कम दिसून येत आहे. पुसद तालुक्यात ११ हजार ७३ शेतकरी थकबाकीदार आहेत. त्यांच्याकडे ३९ कोटी ७१ लाख ७४ हजार रुपये थकीत आहेत. महागाव तालुक्यात १६ हजार १८४ शेतकरी थकबाकीदार असून, त्यांच्याकडे ६२ कोटी २३ लाख २१ हजार रुपये आणि उमरखेड तालुक्यात ६ हजार ९६४ शेतकरी सभासद थकीत असून, त्यांच्याकडे २४ कोटी ३८ लाख ८१ हजार रुपये थकीत आहेत. सर्वात कमी थकबाकीदार उमरखेड तालुक्यात तर सर्वाधिक थकबाकीदार महागाव तालुक्यात आहेत. थकीत रकमेच्या निम्म्यापेक्षा अधिक रक्कम व्याजाची असून, याबाबत शासनस्तरावर कोणताही निर्णय होत नाही. लोकप्रतिनिधी आणि शासनकर्तेही उदासिन दिसत आहेत. अनेक शेतकरी याचे बळी ठरत आहेत. आत्महत्येचे मुळ कारणही थकीत रकमेवरील व्याज हेच आहेत. महागाव तालुक्यात सर्वाधिक थकबाकीदार शेतकरी असण्याचे कारण म्हणजे बँकेच्या कोरडवाहू शेती होय. सिंचनाची कोणतीही सोय नाही केवळ निसर्गावर अवलंबून येथील शेती आहे. यासोबतच शेतकऱ्यांची दलालामार्फत होणारी पिळवणूकही याला कारणीभूत आहे.
पुसद विभागात ३४ हजारावर शेतकरी थकीत
By admin | Updated: July 8, 2015 00:11 IST