पंचायत समिती : शिक्षण विभागाने केल्या १४ नियुक्त्या, संघटनेचा विरोधवणी : येथील पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने ऐन पावसाळ्यात १४ शिक्षकांच्या दुसऱ्या शाळेवर तात्पुरत्या नियुक्त्या केल्या आहेत. शिक्षण विभागाच्या या कारभाराने १४ शिक्षकांवर कुऱ्हाड कोसळली असून त्यांना आपली शाळा सोडून दुसऱ्या शाळेवर रूजू व्हावे लागत आहे. तालुक्यातील विरकुंड, रासा, बोरी, दहेगाव, हिवरधरा, पिंपरी-कायर, उकणी, साखरा पोड, राजूर-इजारा, मारेगाव-कोरंबी, घोन्सा आणि वरझडी-बंडा येथील १४ शिक्षकांच्या आता दुसऱ्या शाळेवर नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. तेथील शिक्षकांना बोरगाव-मेंढोली, निंबाळा रोड, ढाकोरी, रासा, पिंपरी-कायर, कृष्णानपूर, चिलई, कोलेरा, साखरा-दरा, रांगणा, सावर्ला, सोनेगाव, नवरगाव आणि मोहुर्ली येथील शाळेवर पाठविण्यात आले आहे. यात विशेष म्हणजे यासा येथील शिक्षकाला निंबाळा रोड, तर दहेगाव येथील शिक्षकाला रासा येथे पाठविण्यात आले आहे. त्याचप्रमाणे पिंपरी-कायर येथील शिक्षकाला चिलई, तर हिवरधरा येथील शिक्षकाला पिंपरी-कायर येथे पाठविण्यात आले आहे. अर्थात रासा व पिंपरी-कायर येथील शिक्षकांना बदलवून त्यांच्या जागी दुसरा शिक्षक देण्यात आला आहे. त्यामुळे काही शिक्षकांच्या सोयीनुसार, तर काहींच्या मनमानी पद्धतीने नियुक्त्या करण्यात आल्याचे दिसून येत आहे. रासा व पिंपरी-कायर येथे जर दुसऱ्या शिक्षकांना पाठवायचे होते, तर तेथील कार्यरत शिक्षकांना बदलविलेच कशाला, असा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे. गटशिक्षणाधिकाऱ्यांनी स्वत:च्या मर्जीने शिक्षकांच्या प्रतिनियुक्त्या केल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने केला आहे. काही शिक्षकांना सोयीनुसार वारंवार शाळा बदलवून दिल्याचा आरोपही संघाने केला आहे. तसेच मुख्याध्यापकांना सहाय्यक अध्यापक म्हणून नियुक्ती देण्यात आली. शासनाचा आदेश असतानाही द्वि शिक्षकी शाळेतील दोन शिक्षकांना दुसऱ्या शाळेवर पाठविण्यात आले. मुख्याध्यापकांचा प्रभार असतानाही तिघांच्या दुसऱ्या शाळेवर नियुक्त्या करण्यात आल्या. एका शिक्षकाला मूळ पदस्थापनेवर परत पाठविण्यात आले. ११ आॅग्स्टला अतिरिक्त उच्च श्रेणी मुख्याध्यापकांचे समायोजन करताना शिक्षण विभागाने प्रक्रियेच्या वेळी मर्जीतीलच काही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना पाचारण केले. त्यामुळे समायोजन आणि तात्पुरत्या नियुक्त्या आता वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहे. (कार्यालय प्रतिनिधी) तात्पुरत्या स्वरूपात शैक्षणिक अध्यापनाकरिता बदलया संदर्भात प्रभारी गटशिक्षणाधिकारी वामन मेश्राम यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी तात्पुरत्या स्वरूपात शैक्षणिक अध्यापनाकरिता १४ शिक्षकांना दुसऱ्या शाळेवर पाठविल्याचे सांगितले. कोणत्याही शिक्षकाची बदली केली नसून एखाद्या शाळेतील शिक्षक दीर्घ रजेवर असेल, शिक्षिका प्रसूती रजेवर असेल, तर तेथे त्यांना पाठविण्यात आले. जेथे विद्यार्थी संख्या कमी असेल, तेथील शिक्षकाला जादा विद्यार्थी असलेल्या शाळेवर पाठविण्यात आले. पालक व शाळा व्यवस्थापन समितीच्या मागणीनुसार अतिरिक्त शिक्षकांची तात्पुरत्या स्वरूपात शैक्षणिक कार्यासाठी दुसऱ्या शाळेवर पाठविण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. काही शिक्षकांना तक्रारीवरून दुसऱ्या शाळेवर पाठविल्याचे त्यांनी सांगितले. या प्रतिनियुक्त्या अथवा बदल्या नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. काही गावांतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
शिक्षकांच्या नियमबाह्य नियुक्त्या
By admin | Updated: August 26, 2015 02:39 IST