यवतमाळ : येथील सुमित्राबाई ठाकरे नर्सिंग महाविद्यालय प्रशासनाने ओबीसी विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी चक्क महाविद्यालयातून बाहेर काढले. यापूर्वी महाविद्यालय प्रशासनाने शिष्यवृत्तीतून शैक्षणिक शुल्काची कपात करण्याचे लेखी स्वरूपात संमतीपत्र घेतले. मात्र त्यानंतरही विद्यार्थ्यांशी असभ्य वर्तणूक करत त्यांना अपमानित केले. नर्सिंग अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची ६ एप्रिलपासून परीक्षा सुरू होत आहे. त्यापूर्वीच महाविद्यालयाच्या सूचनेप्रमाणे विद्यार्थ्यांनी शैक्षणिक शुल्काचे २५ हजार रुपये जमा केले. उर्वरित रक्कम शिष्यवृत्तीमधून कापण्यात येईल, असे संमतीपत्र घेतले. त्यानंतरही महाविद्यालय प्रशासनाने शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी तगादा लावणे सुरू केले. महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांकडून विद्यार्थ्यांना थेट अपमानीत करून बाहेर काढण्यात आले. या घटनेचा निषेध करत विद्यार्थ्यांनी ओबीसी क्रांतीदलाच्या अॅड़ राजेंद्र महाडोळे जितेंद्र हिंगासपुरे, जितेश बाकडा, प्रदीप सोनुले, विनोद वसाके, निखील भोयर, राजेश चौधरी, विद्यार्थिनी श्वेता देवतळे, सूवर्णा चौधरी यांनी निवासी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली. (कार्यालय प्रतिनिधी)
फीसाठी विद्यार्थ्यांना काढले बाहेर
By admin | Updated: March 27, 2015 01:41 IST