शहराची हद्दवाढ : लोहारा आणि उमरसरा ग्रामपंचायतीचा होकार यवतमाळ : यवतमाळ नगरपरिषदेच्या हद्दवाढी संदर्भात लगतच्या ग्रामपंचायतींंनी ठराव घेतले असून सात ग्रामपंचयतींनी नगरपरिषदेत समाविष्ठ होण्याला विरोध दर्शविला. तर लोहारा आणि उमरसरा ग्रामपंचायतीने मात्र नगरपरिषदेत समाविष्ठ होण्याची तयारी दर्शविली आहे. जिल्हा प्रशासनाने नगरपरिषदेच्या हद्दवाढीची अधिसूचना प्रसिध्द करून त्यावर आक्षेप मागितले होते. या आक्षेपावर जिल्हाधिकाऱ्यांकडे सुनावणी झाली. त्यानंतर हे आक्षेप नगरविकास मंत्रालयात पाठविण्यात आले. नगरविकास विभागाने ग्रामविकास विभागाकडे अहवाल मागितला. त्यावरून ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेतील ठरावाची मागणी करण्यात आली. जिल्हा परिषद स्थायी समितीनेसुध्दा नगरपरिषदेच्या विकासाला होकार दिला आहे. मात्र त्यांनी हा ठराव घेताना काही अट सुध्दा टाकल्या आहेत. तशाच स्वरूपाच्या काही अटी ठेवून लोहार आणि उमसरा ग्रामपंचायतीने नगरपरिषदेत जाण्यास मान्यता दिली आहे. मात्र वडगाव, वाघापूर, भोसा, पिंपळगाव, मोहा, डोर्ली, गोदणी येथील ग्रामपंचयातींनी विरोध दर्शविला आहे. त्याचा अहवाल तयार करून जिल्हा परिषद पंचायत विभाग ग्रामविकास विभागाकडे पाठविणार आहे. त्यानंतरच नगरपरिषदेच्या हद्दवाढी संदर्भात निर्णय होणार आहे. शहरात येणाऱ्या सर्वच प्रमुख ग्रामपंचायतीमध्ये नुकत्याच निवडणूका झाल्या आहेत. शिवाय नोंव्हेंबर २०१६ मध्ये यवतमाळ नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक आहे. त्यामुळे यापूर्वीच या हद्दवाढीच्या प्रस्तावावर निर्णय घेतला जाणार आहे. त्यादृष्टीकोणातून मंत्रालय स्तरावर हालचाली सुरू आहेत. हद्दवाढीबाबत नागरिकांमध्ये सुध्दा उत्सुकता आहे. गृह आणि इतर करांचा बोजा पडेल अशी भीतीही व्यक्त केली जात आहे. तर काही ग्रामपंचायत क्षेत्रात अजूनही मुलभूत सुविधा पोहोचल्या नाही. शिवाय ग्रामपंचायतीला आर्थिक चणचण भासते. त्यामुळे नगरपरिषद झाल्या ही रखडलेली कामे वेळेत पूर्ण होण्याची आशा, असा भागातील नागरिकांत आहे. तरी यासाठी आणखी एक वर्ष प्रतीक्षा करावी लागणार आहे. ग्रामविकास विभागाने अहवाल दिल्यानंतर नगरविकासकडून केव्हा निर्णय घेतला जातो यावरच सर्व काही अवलंबून आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
नगरपरिषदेत जाण्यास सात ग्रामपंचायतींचा विरोध
By admin | Updated: October 7, 2015 02:53 IST