चार लाख बारदान्याची गरज : जयपूर, कोलकाता येथून ट्रक पोहोचलेच नाहीरूपेश उत्तरवार यवतमाळ शेवटच्या दाण्यापर्यंत शेतकऱ्यांच्या तुरीची खरेदी होईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आणि पणनमंत्र्यांनी बुलडाण्याच्या बैठकीत त्याचा पुनरुच्चार करीत बारदाना तत्काळ पोहोचेल, अशी माहिती दिली. मात्र जयपूर आणि कोलकातावरून बारदाना घेऊन निघालेले ट्रक अजूनही पोहोचले नाही. यामुळे तूर खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचा १५ दिवसांपासून मुक्काम आहे. बारदान्याअभावी सहा केंद्रांवर तुरीचा काटा झाला नाही. जिल्ह्यातील १५ केंद्रांवर ३० हजार क्विंटल तूर उघड्यावर पडून आहे. सोमवारपर्यंत बारदाना न आल्यास स्थिती स्फोटक होण्याची भीती आहे.आर्णी, राळेगाव, पुसद, कळंब, वणी आणि घाटंजी हे सहा केंद्र अजूनही बंद आहेत. या केंद्राबाहेर शेकडो क्विंटल तुरीचे ढीग पडून आहेत, तर इतर ९ केंद्रांवरही तुफान गर्दी आहे. बारदाना आणि जागा नसल्यामुळे सहा केंद्रावरची खरेदी थांबली आहे. २८ फेब्रुवारीपासून बारदाना घेऊन निघालेला ट्रक अजूनही जिल्ह्यात पोहोचला नाही. यामुळे शासकीय तूर खरेदी केंद्रावरच्या अडचणी वाढल्या आहेत.आत्तापर्यंत जिल्ह्यातील १५ केंद्रावर ७३ हजार क्विंटल तुरीची खरेदी मार्केटिंग फेडरेशन आणि विदर्भ मार्केटिंग फेडरेशनने केली आहे. तर या १५ केंद्रांवर अजूनही ३० हजार क्विंटल तूर मोजणीच्या प्रतीक्षेत आहे. यामध्ये दररोज वाढ होत आहे. अशा स्थितीतही बारदाना न पोहोचल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप आहे.जिल्ह्याला १५ मार्चपर्यंतच्या खरेदीसाठी दोन लाख पोत्यांचा बारदाना लागणार होता. १५ एप्रिलपर्यंतच्या खरेदीसाठी चार लाख पोते बारदान्याची गरज आहे. यानंतरही खरेदी सुरू राहिल्यास सहा लाख पोते बारदाना लागणार आहे. तरी राज्य शासनाने नाफेडच्या केंद्रावर अजूनही बारदाना पोहचविला नाही. यातून सर्वत्र मोठा गोंधळ उडाला आहे. मार्केटिंग फेडरेशन आणि जिल्हा प्रशासनाने याबाबत सतत पाठपुरावा सुरू ठेवला आहे. त्यांना जयपूर आणि कोलकाता येथून बारदाना निघाल्याचे सांगण्यात आले. प्रत्यक्षात पाच ते सहा दिवस झाल्यानंतरही बारदाना आला नाही. जिल्ह्याला आतापर्यंत केवळ एक लाख पोत्याचा बारदाना मिळाला आहे. तुरीची मोठ्या प्रमाणात आवक सुरू आहे. यामुळे मार्केटिंग फेडरेशनने तोडगा काढण्यासाठी सेंट्रल वेअर हाउसकडून तात्पुरता बारदाना उचलला. आता तो संपला आहे. यामुळे सोमवारपर्यंत बारदाना न पोहोचल्यास शासकीय तूर खरेदी केंद्रावर स्थिती स्फोटक होण्याची भीती आहे.सहा कोटींचे चुकारे थांबलेजिल्ह्यातील केंद्रावर ७३ हजार क्विंटल तुरीची खरेदी झाली. तुरीच्या खरेदीनंतर १५ ते २० दिवसानंतर पैसे मिळत आहेत. यानुसार आतापर्यंत ३० कोटींच्या चुकाऱ्यांचे पैसे जिल्ह्याकडे वळते झाले आहेत. तर सहा क ोटींच्या चुकाऱ्याचे पैसे बाकी आहेत.पावसाच्या अंदाजाने तुरीला धोकाकेंद्रावर मोठ्या प्रमाणात तुरीची आवक झाली. शेडच्या बाहेर पोते पडले आहेत. ३० हजार क्विंटल बाहेर आहे. अशात हवामान खात्याने सोमवार ते बुधवारपर्यंत पावसाचा अंदाज वर्तविला आहे. यामुळे उघड्यावरील तूर भिजण्याचा धोका निर्माण झाला आहे.जिल्ह्याला लागणारा बारदाना तत्काळ मिळावा म्हणून ८ ते १० दिवसापासून पाठपुरावा सुरू आहे. जयपूर आणि कोलकतावरून बारदाना निघाला आहे. वरिष्ठ कार्यालयाकडून तसा संदेशही मिळाला आहे. लवकरच बारदाना पोहचेल आणि तूर खरेदीतील अडचणी दूर होतील.- बजरंग ठाकरे, जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अधिकारी, यवतमाळ
३० हजार क्विंटल तूर उघड्यावर
By admin | Updated: March 6, 2017 01:17 IST