लाखोंची बिदागी : नाराजीचा सूर, संपर्क प्रमुखांकडे तक्रारयवतमाळ : राज्यात सत्ता स्थापन झाल्यानंतर कार्यकर्त्यांना कुपोषण मुक्तीची अपेक्षा आहे. मात्र मर्जीतील एकाचे अतिभरणपोषण आणि इतरांचे कुपोषण असा प्रकार सध्या सुरू आहे. त्यातूनच शिवसेनेच्या गोटात १२ कोटींची कामे व त्यातील ३५ लाखाची बिदागी चर्चेचा विषय ठरली आहे. शिवसेनेतील एका तरूण नेत्याला वेगवेगळ्या विभागातील सुमारे १२ कोटी रुपयांची कामे दिली गेली. सेनेच्या गोटातूनच हे बिंग चर्चेद्वारे फुटले आहे. जलयुक्त शिवार, बांधकाम, कृषी, वने अशा वेगवेगळ्या विभागातून या कामांचे वितरण झाले आहे. प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या अपेक्षेनुसार इच्छुक सर्वांनाच कमी जास्त प्रमाणात ही कामे मिळणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात केवळ जी-हुजरी करणाऱ्या व मर्जी सांभाळणाऱ्या एकाच पदाधिकाऱ्याला ही सर्व कामे दिली गेल्याने सेनेच्या गोटात रोष पहायला मिळतो आहे. या कामांचा मोबदला म्हणून या पदाधिकाऱ्याने एका कार्यक्रमाचे औचित्य साधून ३५ लाखांची बिदागी दिल्याचीही चर्चा आहे. तरूण वर्गाला सांभाळून घेण्याची जबाबदारी पक्षाने या पदाधिकाऱ्यावर दिली होती. मात्र गेल्या एक-दीड वर्षात त्याने पक्ष संघटनेच्या दृष्टीने कोणतीही मोठी बैठक घेतली नसल्याची ओरड होऊ लागली आहे. त्यासंबंधीची तक्रार नुकतीच संपर्क प्रमुख विश्वनाथ नेरूरकर यांच्याकडे दोन ‘उप’ दर्जाच्या पदाधिकाऱ्यांनी केली होती. त्याची नेरूरकरांनी दखलही घेतल्याचे सांगितले जाते. पक्षात झिरो योगदान असलेल्या या पदाधिकाऱ्याची मात्र वरिष्ठांची मर्जी सांभाळण्यात मास्टरी आहे. या पदाधिकाऱ्याने जिल्ह्याच्या एका मागास तालुक्यात कृषी खात्यामार्फत मोठ्या प्रमाणात कामांचे कंत्राट घेतले आहे. आता तो जिल्हा परिषदेची निवडणूक लढविण्याचीही तयारी करतो आहे. जिल्ह्याच्या टोकावरील विधानसभा मतदारसंघात फिरताना हा पदाधिकारी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना सोडून अन्य स्पर्धक पक्षांच्या नेत्यांशी जवळीक ठेवत असल्याची ओरड आहे. शासकीय कंत्राट मिळविणे, त्यातून आवश्यक तेथे बिदागी देणे एवढेच नव्हे तर वसुलीतही हा पदाधिकारी निष्णांत असल्याचे सांगितले जाते. या वसुलीतूनच या पदाधिकाऱ्याचा गेल्या आठवड्यात एका बड्या लोकप्रतिनिधीशी वादही झाला होता. त्याने सीमावर्ती भागातून तब्बल १२ लाख रुपयांची वसुली केली. ही बाब त्या बड्या लोकप्रतिनिधीला कळताच त्याने आकांततांडव केला. १२ लाख देणाऱ्या त्या शासकीय अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. ‘तुमच्या भागाचा बडा लोकप्रतिनिधी मी की तो’ ? असा सवाल करण्यात आला. कोट्यवधींची कामे मिळविणाऱ्या या तरुण पदाधिकाऱ्याविरुद्ध सेनेच्या गोटात असंतोष आहे. हे आर्थिक हेवेदावे ‘मातोश्री’वर नेण्याची तयारीही सेनेत सुरू आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
सेनेतील एकालाच १२ कोटींची कामे
By admin | Updated: July 9, 2015 02:34 IST