एकात्मिक बाल विकास योजना : एक लाख ९८ हजार बालकांची यादी यवतमाळ : जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाकडून एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतून बालक आणि गरोदर मातांना पूरक पोषण आहार देण्यात येते. यासाठी अंगणवाडीस्तरावर केंद्र आहेत. ही योजना अधिक पारदर्शी करण्यासाठी आता येथील लाभार्थ्यांची आॅनलाईन नोंदणी केली जात आहे. त्यासाठी प्रत्येकाचे आधार नंबर घेऊन यादी बनविण्यात येत आहे. त्यामुळे आता योजना राबविणाऱ्या यंत्रणेचे होणारे अतिपोषण थांबणार आहे. जिल्ह्यात २ हजार ४६० अंगणवाड्या आहेत. येथे बालक आणि गरोदर मातांना शासनाकडून मोफत पोषण आहार देण्यात येत होता. मात्र बरेचदा कागदोपत्री लाभार्थी अथवा पटसंख्या दाखवून पोषण आहाराची विल्हेवाट लावली जायची. तशा अनेक तक्रारीही सुध्दा शासनस्तरावर सातत्याने प्राप्त होत होत्या. आता अंगणवाडीत येणाऱ्या प्रत्येक मुलाचा आधार क्रमांक आणि गावातील गरोदर मातेचेही आधार कार्डद्वारे आॅनलाईन यादी तयार केली जात आहे. याला लाईम लिस्टींग कार्यक्रम म्हणून राबविण्यात येत आहे. याच लिस्टच्या माध्यमातून आरोग्याच्या संपूर्ण संदर्भ सेवा राबविण्यात येणार आहे. या नोंदणीची सुरूवात झाली असून आतापर्यंत एक लाख ९८ हजार बालक व गरोदर मातांची नोदंणी झाली आहे. यामध्ये १६ हजार गरोदर माता आहेत. नोंदणीसाठी दोन लाख २१ हजारचे उद्दिष्ट ठेवले आहे. निर्धारीत कालावधीत ही नोंदणी पूर्ण केली जाणार आहे. या नोंदणीसाठीच पंचायत समितीस्तरावर बालविकास प्रकल्प कार्यालयाकडून जिल्हा परिषदेत आधार कार्डचे गठ्ठे पाठविण्यात आले आहे. या नोंदणी कार्यक्रमात अंगणवाडी सेविकाही मुख्य घटक असून सुपरवायझर आणि बालविका प्रकल्प अधिकारी यांच्या नियंत्रणात राबविण्यात येत आहे. विशेष म्हणजे ही संपूर्ण माहिती दर महिन्याला अद्ययावत करावी लागणार आहे. यासाठी संबंधित विभागाकडून आवश्यक ती प्रक्रिया राबविली जाणार आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
गरोदर माता, बालकांची आॅनलाईन नोंदणी
By admin | Updated: December 25, 2016 02:38 IST