मान्यवरांचे मार्गदर्शन : मागणी केल्यास १५ दिवसांच्या आत कामलोणबेहळ : रोजगार दिनाच्या निमित्ताने येथील ग्रामपंचायतीत ‘एक दिवस मजुरांसोबत’ हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला परीविक्षाधीन अधिकारी निमा अरोरा, तहसीलदार सुधीर पवार, नायब तहसीलदार तुंडलवार, गटविकास अधिकारी सी.जी. चव्हाण, पशुसंवर्धन अधिकारी डॉ.विजयकर, कृषी पर्यवेक्षक व्ही.बी. पवार, सामाजिक वनीकरण विभागाचे आर.ए. राठोड आदी मान्यवर उपस्थित होते. या अधिकाऱ्यांनी आपआपल्या विभागाच्या योजनांबद्दल माहिती दिली. नागरिकांनी विचारलेल्या विविध प्रश्नांचे निरसन करण्यात आले. गटविकास अधिकारी चव्हाण यांनी रोजगार हमी योजनेची कामे ४०-६० या प्रमाणात करावी, असे सांगितले. मजुराने कामाची मागणी केल्यानंतर १५ दिवसांच्या आत काम देण्यात येईल. अन्यथा बेकारी भत्ता देण्यात येईल, असे सांगितले. कृषी पर्यवेक्षक व्ही.बी. पवार यांनी फळझाड लागवड, शेततळे, विहीर पुनर्भरण आदी कामे एमआरईजीएस योजनेत येत असल्याचे सांगितले. सामाजिक वनीकरण विभागाचे राठोड यांनी रस्त्याच्या दुतर्फा वृक्षलागवडीची योजना असल्याचे सांगितले. डॉ. विजयकर यांनी दुधाळ जनावरे पालन व चारा निर्मितीबद्दल माहिती दिली. या कार्यक्रमात आधार कार्ड व रेशन कार्ड बनविण्याचे कामही करण्यात आले. तहसीलदार सुधीर पवार यांच्याकडे गावातील शेतकऱ्याने मंजुरात असलेल्या लोणबेहळ ते घोन्सरा हा अपूर्ण रस्ता पूर्ण करावा, अशी मागणी केली. कारण या रस्त्याने गाडीबैल नेताना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. तसेच रामहरी राजेश यांच्या शेतापर्यंत नाला सरळीकरण व खोलीकरण झालेले आहे. त्यांच्या शेताजवळील अपूर्ण नाल्याचे काम पूर्ण करावे, अशी मागणी करण्यात आली. कार्यक्रमाला सरपंच उज्ज्वल मोरे, उपसरपंच संगीता तिळे, रंजना गावंडे, संगीता मडावी, सतीश भगत, लिंगाजी मंगाम, लवकुश शुक्ला, विस्तार अधिकारी ठेंगेकर, तलाठी राठोड, राहुल हसनाळकर, चौधरी, खुटाफळे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन स्वप्नील सरडे यांनी केले. आभार ग्रामसेवक पी.पी. वाघमारे यांनी मानले. (वार्ताहर)
लोणबेहळ येथे ‘एक दिवस मजुरांसोबत’
By admin | Updated: October 3, 2015 02:17 IST