दारव्हा : तालुक्यातील ब्रह्मनाथ शिवारात दोन महिन्यांपूर्वी झालेल्या बिबट्याच्या मृत्यूप्रकरणी एकाला मंगळवारी पोलिसांनी अटक केली. या बिबट्याचा मृत्यू विषप्रयोगाने झाल्याचे स्पष्ट झाले आहे. वन विभागाला अखेरीस या प्रकरणाचा छडा लावण्यात यश आले आहे.शंकर किसन चित्रे (२४) रा.हातणी असे आरोपीचे नाव असून शेळी मारल्यामुळे त्याने बिबट्यावर विष प्रयोग केल्याचे पोलिसांनी सांगितले. ११ जानेवारीला ब्रह्मनाथ शिवारात बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली होती. प्राथमिक चौकशीनंतर शवविच्छेदन अहवालावरून त्याचा मृत्यू उपासमारीने झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. असे असले तरी वन विभागाने आपली चौकशी सुरूच ठेवली होती. गावात ठेवलेली पाळत व मिळालेल्या गोपनीय माहितीवरून आरोपी शंकर चित्रे याा सहभाग उघडकीस आला. त्यामुळे त्याला मंगळवारी ताब्यात घेण्यात आले. आरोपीला प्रशांत खरे याने मदत केल्याचे सांगण्यात आले. सध्या प्रशांत फरार आहे. घटनेनंतर वनविभागाने सातत्याने या प्रकरणाचा तपास करून हे यश संपादन केले आहे. उपविभागीय वन अधिकारी राहुल गवई, वनपरिक्षेत्र अधिकारी पी.व्ही. नाल्हे, क्षेत्रसहाय्यक ए.आर. धोत्रे आदींनी यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. (तालुका प्रतिनिधी)
बिबट्या मृत्यूप्रकरणी एकास अटक
By admin | Updated: March 18, 2015 02:23 IST