यवतमाळ : उघड्या घरातून एक लाख २० हजाराचा मुद्देमाल लंपास करणाऱ्या अट्टल चोरट्याला प्रथम श्रेणी न्यायालयाने दीड वर्ष सक्त मजुरीची शिक्षा सुनावली. त्याला सप्टेंबर महिन्यात टोळीविरोधी पथकाने अटक केली होती. कान्हा उर्फ कृष्णा मारोती घोसाळकर (२३) रा. सिंघानियानगर असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. त्याने १६ सप्टेंबरला दुपारी पंकज गोविंदवार यांच्या घरातून रोख ५५ हजार, ६५ हजाराचे दागिने, एक मोबाईल असा मुद्देमाल लंपास केला होता. या गुन्ह्याचा तपास टोळी विरोधी पथकाने केला. सहाय्यक निरीक्षक प्रशांत गीते, उपनिरीक्षक संतोष मनवर यांनी आरोपीला अटक केली. जमादार विजय मानकर यांनी दोषारोपपत्र सादर केले. न्या. एम.के. पाटील यांनी आरोपी घोसाळकरला दीड वर्ष सक्त मजुरी व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या खटल्यात सहाय्यक सरकारी अभियोक्ता चंद्रकांत उके यांनी बाजू मांडली. (कार्यालय प्रतिनिधी)
अट्टल चोरट्याला दीड वर्ष सक्त मजुरी
By admin | Updated: January 13, 2017 01:30 IST