पवन लताड
यवतमाळ : भारताचे नंदनवन असलेल्या काश्मीरमधील पहलगाम येथे यवतमाळातील पाच कुटुंबे पर्यटनासाठी गेली होती. २२ एप्रिलला सकाळी नऊ वाजता ही पाचही कुटुंबे पर्यटन करून परतीच्या प्रवासासाठी निघाली अन् दुपारी दोनच्या सुमारास दहशतवादी हल्ला झाला. यामुळे परतीचे सर्व मार्ग बंद झाल्याने पाचही कुटुंबे चिंतेत पडली. मात्र, अडचणीत सापडलेल्या या पाच कुटुंबांना तेथील एका मुस्लीम कुटुंबाने घरी आश्रय दिला. त्यानंतर २४ एप्रिलला हे पर्यटक यवतमाळात सुखरूप परतले. त्या भयाण रात्री घरातील तीनपैकी दोन खोल्या आम्हा पाच कुटुंबासाठी देणारे खुर्शीद भाई आणि शाहिस्ता परवीन हे दाम्पत्य आमच्यासाठी देवदूतच ठरल्याच्या भावना पर्यटकांनी व्यक्त केल्या आहेत.
येथील भांडारकर, तिडके, क्षेत्रपाल, कुटुंबिय पर्यटनासाठी गेले होते. यातील चार कुटुंबे यवतमाळातील, तर एक दाम्पत्य नागपूरचे आहे. १० एप्रिलला पाचही कुटुंबे नागपूर येथून विमानाने दिल्ली आणि पुढे अमृतसर, श्रीनगरला गेले होते. विविध ठिकाणी पर्यटनाचा आनंद घेतल्यानंतर हे सर्व जण पहलगाम येथे आले. २२ एप्रिलला सकाळी पर्यटकांनी तेथील बेताब व्हॅली बघितली. सकाळी ९ वाजता जम्मूला जाण्यासाठी बसने निघाले. दरम्यान, ३५ किलोमीटरचे अंतर पार केल्यानंतर बोनीगाम येथे बस अडविण्यात आली.
दोन खोल्या आम्हाला देऊन ते स्वयंपाकघरात राहिले
पर्यटकांनी सांगितले की, पहलगाम येथे दहशतवाद्यांनी हल्ला केला असून, यात अनेक जण ठार झाले आहेत. त्यामुळे या मार्गावरील रस्ते बंद असल्याने तुम्हाला पुढे जाता येणार नाही, अशी माहिती आम्हाला वाटेत देण्यात आली.दहशतवादी हल्ल्याचे नाव ऐकताच आमचा थरकाप उडाला. आता काय करायचे, पुढे घरी कसे जायचे, कुठे राहायचे, कोण मदत करणार, असे अनेक प्रश्न आमच्यासमोर उभे राहिले. घाबरलेल्या चेहऱ्यावरील हे भय तेथे असलेल्या खुर्शीद भाई आणि शाहिस्ता परवीन या दाम्पत्याने नेमके टिपले आणि त्यांनी धीर दिला. आम्हाला आधार देण्यासाठी ते कोणताही विचार न करता धावून आले.
खुर्शीद भाई यांचे बोनीगाम येथे तीन खोल्यांचे घर आहे. याच घरी ते पाचही ⑤ कुटुंबांना घेऊन गेले. रस्त्यातही ते घाबरू नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत, सर्व काही व्यवस्थित होईल, असा धीर देत होते. स्वयंपाक घर आणि दोन खोल्या एवढेच त्यांचे घर होते. परिस्थितीचे गांभीर्य आणि आमच्या सुरक्षिततेला महत्त्व देऊन त्यांनी आम्हा पाच कुटुंबासाठी घरातील दोन खोल्या उपलब्ध करून दिल्या.
ते संपूर्ण कुटुंब स्वयंपाक घरामध्ये राहिले. रात्री आम्हा सर्वांना जेवणाचीही विचारणा केली, तसेच रस्ता सुरू होईपर्यंत तुम्ही येथेच थांबा, असा धीरही दिला. हे दाम्पत्य त्या संकटकाळात आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच होते, अशा शब्दांत या पर्यटकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
चालकाच्या घाईमुळे वाचले ५ कुटुंबांचे जीव
बेताब व्हॅलीनंतर बैसन व्हॅली पाहण्याचा बेत आखला. मात्र, चालक येथूनच परत जाण्यासाठी घाई करीत होता. त्यामुळे आम्हाला बैसन व्हॅलीला जाता आले नाही; परंतु जम्मूकडे निघाल्यानंतर काही तासांतच दहशतवादी हल्ला झाला, असे नरेंद्र भांडारकर यांनी सांगितले.
६ तासांचे अंतर मात्र १३ तास केला प्रवासबोनीगाम येथे रात्र काढल्यानंतर दुसऱ्या दिवशी पर्यटकांपैकी चंद्रशेखर क्षेत्रपाल यांनी नागपूर येथील आमदारांशी संपर्क साधून अडकून पडल्याची माहिती दिली. त्यांनी आयुक्तांशी संपर्क साधला. त्यानंतर पूश, राजोरी मार्गाने परतीचा प्रवास सुरू झाला. जिप्सी वाहनाने जम्मूपर्यंत पर्यटक पोहोचले. जम्मूचे अंतर सहा तासांचे असताना १३ तास प्रवास करावा लागला.