कळंब : येथील आदिवासी मुलींच्या वसतिगृहाला आमदार डॉ. अशोक उईके यांनी काही दिवसांपूर्वी भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी अनुभवलेल्या समस्या मंगळवारच्या (१ सप्टेंबर) आकस्मिक भेटीतही आढळून आल्या. सदर वसतिगृहातील विद्यार्थिनींना मेनुकार्डनुसार भोजन आणि पोषण आहार नियमानुसार दिला जात नाही, हे मंगळवारीही स्पष्ट झाले. सोमवारी खराब व सडके डाळिंब वाटण्यात आले. विद्यार्थिनींनी ते नाकारले. यानंतर देण्यात आलेले सफरचंदही अतिशय लहान होते. नाश्त्यामध्ये उपमा व पोहेच दिले जाते. कडधान्याचा नाश्ता अभावानेच असतो. जेवणात कच्या पोळ्या दिल्या जातात. याची तक्रार करूनही फरक पडत नसल्याची तक्रार विद्यार्थिनींनी आमदार डॉ.उईके यांच्याकडे केली. त्यावर आमदार चांगलेच संतापले. सूचना करूनही सुधारणा होत नाही, ही गंभीर बाब आहे. मात्र यापुढे कारवाई केली जाईल, असे त्यांनी अधीक्षक तेलंगे यांना सांगितले.रात्री ८ वाजताच्या दरम्यान वसतिगृहाला भेट दिल्यानंतर आमदार डॉ.उईके यांनी भोजनाच्या नमुन्याची मागणी करून त्याचा आस्वाद घेतला. बेचव भाजी आणि कच्च्या पोळीचे जेवन त्यांना करावे लागले. यावेळी तहसीलदार संतोष काकडे आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
आमदारांनी दुसऱ्या भेटीतही अनुभवल्या जुन्याच समस्या
By admin | Updated: September 2, 2015 03:58 IST