आढावा बैठक : उपविभागीय अधिकाऱ्यांचे आदेश लोकमत न्यूज नेटवर्क महागाव : सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून नैसर्गिक आपत्ती कुणालाही सांगून येत नाही. त्यामुळे या दिवसात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सतर्क राहावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी स्वप्नील कापडनिस यांनी येथे केले. महागाव तहसील कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी तालुक्यात सुरू असलेल्या जलयुक्त शिवार, वृक्षलागवड आदी संदर्भातील माहिती जाणून घेतली. तालुक्यात लघु पाटबंधारे विभागामार्फत अंतर्गत सिमेंट बंधाऱ्याची अनेक कामे करण्यात आली. ही कामे अर्धवट असल्याने पावसात नाल्याला पूर येवून बंधाऱ्याचे नुकसान होत आहे. तसेच शेतातही पाणी शिरत आहे. त्यावर तत्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना एसडीओंनी दिल्या. शतकोटी वृक्षलागवड योजनेचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे वन अधिकाऱ्यांना दिले. पावसाळ्याच्या दिवसात अडचण येणार नाही यासाठी तत्पर राहण्याचे निर्देशही देण्यात आले. यावेळी तहसीलदार नामदेव इसाळकर, गटविकास अधिकारी राहुल शेळके, ठाणेदार करीम मिर्झा, बांधकाम विभागाचे उपअभियंता नाईक, मंडळ अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
पावसाळ्यात अधिकाऱ्यांनी सतर्क राहावे
By admin | Updated: June 18, 2017 00:59 IST