यवतमाळ : राज्यात सुमारे १५ हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुका होऊ घातल्या आहे. या निवडणुका पहिल्या, दुसऱ्या टप्प्यात घेण्यात येणार आहे. निवडणूक प्रक्रियेत उमेदवारांचे नामांकन आॅनलाईन भरण्याचा प्रयोग यवतमाळसह १० जिल्ह्यात करण्याचे प्रस्तावित आहेत. या बाबत निवडणूक आयोगाकडून यंत्रणेचा आढावा घेण्यात येत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली जाणार आहे. हा आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी गावालगतच्या परिसरातून महासंग्राम केंद्राचा आधार घेण्यात येणार आहे. त्यासाठी महासंग्राम केंद्र हे आॅनलाईन असणे, तेथे वीजपुरवठ्याची सोय असणे यासह इतर जुजबी सोयी-सुविधा करून द्याव्यात, अशी मागणीही जिल्हा प्रशासनाकडून आयोगाकडे करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने या संदर्भात जिल्हास्तरावरच्या निवडणूक अधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे. हा नवीनच प्रयोग पहिल्या टप्प्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत राबविला जाण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात एप्रिलमध्ये ६०० ग्रामपंचायतींची निवडणूक होवू घातली आहे. त्या अनुषंगाने पडताळणी केली जाणार आहे. ग्रामीण भागातील उमेदवाराला अतिशय सोप्या भाषेत व सुटसुटीत असा उमेदवारी अर्ज उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात आहे. जेणेकरून हा उमेदवार स्वत:च महासंग्राम केंद्रात जाऊन नामांकन भरू शकेल, त्या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू आहेत. केवळ एका पानाचा उमेदवारी अर्ज राहणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर ग्रामपंचायतींचे नामांकन आॅनलाईन भरण्यास कोणत्या अडचणी येतात, याचाही आढावा घेतला जात आहे. अद्याप तरी या बाबत ठोस निर्णय झालेला नाही. मात्र ही प्रक्रिया राबविण्यासाठी येणाऱ्या सर्व अडचणींची शक्यता पडताळली जात आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
आता ग्रामपंचायत निवडणुकीत नामांकन होणार आॅनलाईन
By admin | Updated: March 16, 2015 01:50 IST