यवतमाळ : ग्रामपंचायत निवडणुकीत विहित मुदतीत खर्च सादर न करणाऱ्या जिल्ह्यातील सात हजार ६२६ ग्रामपंचायत उमेदवारांना निवडणूक विभागाने नोटीस बजावली आहे. ३० दिवसात खर्चाचा हिशेब सादर न केल्यास अपात्रतेची कारवाई केली जाणार आहे. यामुळे विजयी उमेदवारांचे धाबे दणाणले असून खर्चाचा हिशेब जुळविण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील ४२८ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक आणि पाच ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुका पार पडल्या. गुरुवारी या निवडणुकांचा निकाल जाहीर झाला. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता जाहीर करण्यात आली होती. निवडणूक संपताच उमेदवारांना आपला खर्च सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. एका उमेदवाराला ग्रामपंचायत निवडणुकीत २५ हजार रुपये खर्च करण्याची मुभा देण्यात आली होती. निवडणुकीच्या कालावधीत किती खर्च केला याबाबतचा अहवाल कोणत्याही उमेदवाराने सादर केला नाही. त्यामुळे निवडणूक विभागाने ३० दिवसात हा अहवाल सादर करण्याची नोटीस उमेदवाराला बजावली आहे. तहसील कार्यालयात हा अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहे. ३० दिवसानंतरही अहवाल सादर केला नाही तर पुढील कोणत्याही निवडणुकांसाठी सदर उमेदवार अपात्र ठरणार आहे. तसेच या उमेदवारांवर कारवाई केल्या जाईल. ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. मात्र अनेक ग्रामपंचायतींचा कार्यकाळ एप्रिल, मे आणि जून महिन्यात संपणार आहे. त्या ठिकाणी प्रशासक म्हणून ग्रामसेवकाची नियुक्ती करण्यात आली आहे. कार्यकाळ संपण्याच्या एक दिवस आधी नवीन सरपंचाची निवड केली जाणार आहे. (शहर वार्ताहर)
सात हजार ग्रामपंचायत उमेदवारांना नोटीस
By admin | Updated: April 25, 2015 01:53 IST