नगराध्यक्ष निवडणूक : शेकडो समर्थकांच्या उपस्थितीत शक्तीप्रदर्शनयवतमाळ : यवतमाळ नगरपरिषद काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार संध्याताई सव्वालाखे यांनी गुरुवारी शक्तीप्रदर्शन करीत आपले नामांकन दाखल केले. जिल्हा काँग्रेस कार्यालयापासून रॅलीने येऊन येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात नामांकन दाखल केले. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून काँग्रेसमधील ज्येष्ठ पदाधिकारी संध्याताई सव्वालाखे यांचे नाव निश्चित केले. सव्वालाखे यांनी यापूर्वी जिल्हा परिषद अध्यक्ष पद भूषविले आहे. तसेच पक्ष संघटनेतही विविध पदे भूषविली आहे. त्यांचा राजकीय अनुभव लक्षात घेता प्रदेश काँग्रेस कमिटीकडून संध्याताई सव्वालाखे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. गुरुवारी त्यांनी समर्थकांसह येथील उपविभागीय अधिकारी राजेंद्र देशमुख यांच्याकडे नामांकन दाखल केले. तत्पूर्वी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात सर्व नेते मंडळी व कार्यकर्ते एकत्र आले. ढोलताशाच्या गजरात तहसील कार्यालयापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. यानंतर नामांंकन सादर केले. त्यावेळी विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, आमदार यशोमती ठाकूर, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष वामनराव कासावार, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, माजी मंत्री वसंतराव पुरके, माजी आमदार नंदिनीताई पारवेकर, काँग्रेस जिल्हा प्रभारी श्याम उमाळकर, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर, किशोर दर्डा, काँग्रेसचे विधान परिषद उमेदवार शंकर बडे, जीवन पाटील आदी उपस्थित होते. शहर विकासासाठी कटीबद्ध - संध्याताई सव्वालाखेकाँग्रेस पक्षाच्या ध्येय धोरणानुसारच शहराच्या सर्वांगीण विकासाचा प्रयत्न करणार आहे. यवतमाळात अनेक समस्या असून त्या सोडविण्यासाठी नगरपरिषदेच्या माध्यमातून कटीबद्ध असल्याचे काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार संध्याताई सव्वालाखे यांनी नामांकन दाखल केल्यानंतर ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. भाजपाचे माजी नगराध्यक्ष काँग्रेसमध्ये निवडणुकीच्या रणधुमाळीत पक्षांतर सुरू असून यवतमाळातील भाजपाचे माजी नगराध्यक्ष योगेश गढिया हे समर्थकांसह काँग्रेसमध्ये गेले. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीतील माजी बांधकाम सभापती माधुरी अराठे यासुद्धा होत्या. संध्याताई सव्वालाखे यांचे नामांकन भरण्यासाठी या दोनही माजी पदाधिकाऱ्यांनी आवर्जुन उपस्थिती लावली होती. नगराध्यक्षासाठी २ तर नगरसेवकासाठी २० अर्जनामांकनाच्या चौथ्या दिवसापर्यंत नगरसेवक पदासाठी २० अर्ज प्राप्त झाले होते. त्यात दोन नामांकन हे नगराध्यक्षपदासाठी आहेत. यामध्ये काँग्रेसकडून संध्याताई सव्वालाखे तर अपक्ष म्हणून डॉ. अस्मिता जयसिंह चव्हाण यांनी अध्यक्षसाठी नामांकन दाखल केले. शेवटच्या दोन दिवसात नामांकनासाठी मोठी गर्दी उसळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
काँग्रेसच्या संध्याताई सव्वालाखे यांचे नामांकन
By admin | Updated: October 28, 2016 02:00 IST