वणी : वणी परिसरात ध्वनी प्रदूषणाने कहर केला असून जणू गगनाला भीडणारे आवाज काढण्याची स्पर्धाच लागली की काय?, असा भास होत आहे़ एवढे असूनही मात्र पोलिसांनी कानावर हात ठेवल्याचे दिसत आहे़ ठिकठिकाणी ध्वनी प्रदूषण नियंत्रण कायद्याची पायमल्ली होत असतानाही पोलीस प्रशासन कारवाई करण्यास कचरत आहे़ ज्याप्रमाणे वायू व जल प्रदूषण मानवी आरोग्यास धोकादायक आहे, त्याचप्रमाणे ध्वनी प्रदूषणसुध्दा मानवाचा रक्तदाब, हृदयाचे ठोके वाढविण्यास कारणीभूत ठरतो़ मानवी कानाचे पडदे काही मर्यादेपर्यंतचा आवाज सहन करू शकतात़ त्यामुळे मानवी आरोग्याचे हीत लक्षात घेऊन शासनाने ध्वनी प्रदूषण (नियम नियंत्रण) अधिनियम-२००० तयार केला़ या अधिनियमाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलीस प्रशासनावर अधिक आहे़ मात्र वणी परिसरात तरी पोलीस प्रशासन नियमाची अंमलबजावणी करण्यास हतबल ठरत आहे़ कुणाला उगीच कशाला दुखवायचे, अशी पोलिसांनी भूमिका हजारो जणांचे कान मात्र दुखवित आहे़ विविध धार्मिक कार्यक्रम, लग्न, मिरवणुका, विजयोत्सव यामध्ये नियमांचे उल्लंघन होत आहे़ एका ठिकाणी डीजे वाजविला व त्याकडे पोलिसांनी दुर्लक्ष केले, तर दुसरा त्याचे मोबाईलमध्ये चित्रीकरण करून ठेवतो व वेळ आल्यावर स्वत:ही कायद्याचे उल्लंघन करून पोलिसांना पूर्वीची आठवण करून देतो़ त्यामुळे ध्वनी प्रदूषण कायदा मोडण्याची जणू स्पर्धाच लागली आहे़ भर चौकात, शहरातील रस्त्यावर निघणार्या मिरवणुका, विजयोत्सव, जयंती, सण-उत्सव यावेळी कानाच्या ठिकळ्या उडविणारे आवाज सुरू असतात़ जवळपासच्या परिसरात एकमेकांना संवाद साधणे कठीण होऊन जाते़ नुकत्याच झालेल्या निवडणुका व त्याचे विजयोत्सव जनतेने कानावर हात ठेवून पाहिले आहे़ लगतच्या वरातीमधील बॅन्ड, कार्यक्रमात वाजणारे डीजे, हे परिसरातील जनतेची झोपमोड करणारे ठरत आहे़ रूग्णांनाही त्याचा फटका बसत आहे़ यापूर्वीच्या काही ठाणेदारांनी त्यावर वचक निर्माण केला होता. मात्र ‘वाघ’ साहेबांची डरकाळी कधी वणीकरांनी ऐकलीच नाही़ त्यामुळे तालुक्यात ध्वनी प्रदूषणाला जोर चढत आहे. यासोबतच कायदा मोडण्याची हिंमत नागरिकांमध्ये वाढली आहे़ सकाळी सहा वाजण्यापूर्वीच ध्वनीक्षेपकातून नादगर्जना जनतेच्या कानी पडत आहे़ (स्थानिक प्रतिनिधी)
ध्वनी प्रदूषण गेले नियंत्रणाबाहेर
By admin | Updated: May 18, 2014 23:56 IST