अमरसिंग जाधव : पुसद येथे शांतता समितीची सभा लोकमत न्यूज नेटवर्क पुसद : कोणतेही शहर संवेदनशील नसते. ती प्रवृत्ती असते. पोलीस कर्मचाऱ्याला जात, धर्म, पंथ नसतो. तो पोलीस म्हणून आपले कार्य करीत असतो. जनतेच्या अडीअडचणी जाणून घेऊन पोलीस प्रशासन व जनता यांच्यातील दरी कमी करण्यासाठी पोलीस-जनता सुसंवाद राहावा, पोलिसांनी आपण जनतेचा मित्र आहो ही भावना ठेऊन कर्तव्य पार पाडावे असे आवाहन अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक अमरसिंग जाधव यांनी शांतता समिती सभेत केले. यवतमाळ जिल्हा पोलीस दलात रुजू झाल्यानंतर अमरसिंग जाधव यांनी पुसद शहर पोलीस ठाण्याच्या आवारातील सुधाकरराव नाईक सभागृहात शांतता कमिटीची बैठक घेतली. या बैठकीला उपविभागीय पोलीस अधिकारी अजयकुमार बन्सल, शहर ठाणेदार वाघू खिल्लारे, ग्रामीणचे ठाणेदार धनंजय जगादाळे उपस्थि होते. या बैठकीत भीमराव कांबळे, नगरसेवक निखील चिद्दरवार, रेश्मा लोखंडे, संजय हनवते यांनी शहरातील समस्या मांडल्या. यावेळी बोलताना अमरसिंग जाधव म्हणाले पुसदची जुनी शांतता समितीची कार्यकारिणी बरखास्त करून नवीन कार्यकारिणी गठीत करावी. डॉक्टर, शिक्षक, समाजसेवक, पत्रकार, व्यापारी, लोकप्रतिनिधी अशा कार्यतत्पर लोकांना समितीत घ्यावे, असे सांगितले. तसेच शहरातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी नगरसेवक सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, पत्रकार यांना घेऊन समिती गठीत करा, पोलिसांची कारवाई नि:पक्ष राहावी यासाठी डिवायएसपी बन्सल यांनी विशेष लक्ष द्यावे, असे सांगितले. या बैठकीला निखील चिद्दरवार, राजू कोटलवार, ताहेर खान पठाण, अनिस चव्हाण, ललित सेता, अनिल चेंटकाळे आदी उपस्थित होते.
पोलीस व जनतेत सुसंवादाची गरज
By admin | Updated: May 14, 2017 01:18 IST