यवतमाळ : गोरगरीब शेतकरी, शेतमजूर जनतेला अन्न सुरक्षा योजनेच्या माध्यमातून आघाडी सरकारने दिलासा दिला होता. मात्र ही महत्त्वाकांक्षी योजना सत्ताधाऱ्यांनी बंद केली. त्यामुळे अनेकांची उपासमार होत आहे. तेव्हा ही योजना पूर्ववत सुरू करावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आमदार संदीप बाजोरिया, आमदार ख्वाजा बेग यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांना निवेदन देण्यात आले. भाजप-शिवसेना युतीच्या सरकारने गोरगरीब शेतकरी, शेतमजूर यांच्या हक्काचे अन्नधान्य अन्न सुरक्षा योजना बंद करून हिरावले आहे. अन्न सुरक्षा योजने अंतर्गत राज्यातील एक कोटी ७७ लाख केसरी शिधाधारकांना १० किलो गहु व पाच किलो तांदूळ असे १५ किलो धान्य सवलतीच्या दरात मिळत होते. मात्र ही महत्वाकांक्षी योजना बंद करून युती शासनाने गोरगरीबांवर उपासमारीची वेळ आणल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे. निवेदन देतेवेळी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. आरती फुफाटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नाना गाडबैले, जिल्हा परिषदेचे गटनेते प्रवीण देशमुख, निलय नाईक, वसंत घुईखेडकर, रमेश मानकर, जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती सुभाष ठोकळ, समाज कल्याण सभापती लता खांदवे, सुरेश चिंचोळकर, नरसिंग सत्तुरवार, नरेश ठाकुर, लोकेश इंगोले, पंचायत समिती सदस्य, विवेक देशमुख, राहुल कानारकर, हरीष कुडे, उमेश ठाकरे, दीपक धात्रक, समीना शेख, फरीना शेख, क्रांती राऊत, पांडुरंग खांदवे, पंकज मुंदे, नीलेश देशमुख, अशोक राऊत, निठु पाटील, नीरज पवार आदी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)
अन्न सुरक्षा योजनेसाठी राष्ट्रवादीचे निवेदन
By admin | Updated: February 3, 2015 23:03 IST