शरीरयष्टी धस्टपुस्ट असल्याने मनगटातील जोरावर दहशत पसरवून स्वत:च्या व्यसनाची भूक भागविणे एका युवकाला चांगलीच महागात पडली. दारू पाजण्यासाठी जवळच्या मित्राला केलेली मारहाण जीवावर बेतली. चारचौघात मारहाण करून झालेला अपमान सहन न झाल्याने या मित्राने दुसऱ्याच दिवशी त्याचा बदला घेतला. कधीकाळच्या मैत्रीला रक्तरंजित किनार लागली. या गुन्ह्यात जावयाच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी धावून आलेला मेव्हणाही गुन्हेगार ठरला आहे. दहशत पसरवून आपली गरज भागविणारे फार काळ कोणाचे मित्र असूच शकत नाही, याचा प्रत्यय पांढरकवडातील खुनाच्या घटनेतून येतो. दिवसभर बाजारपेठ परिसरात फिरून टवाळखोरी करणे, रात्रीच्या जेवणाच्या सोयीपेक्षा पिण्याची व्यवस्था कशी होईल याच बेतात राहणे, मिळेल त्याला धमकावून प्रेमाने शक्य होईल त्या पद्धतीने पैसे उखळणे आणि मौज करणे हा एकमेव कार्यक्रम घेवून जगणाऱ्याचा अंतही तितकाच घातक असतो. बऱ्याचदा वाद नको म्हणून अशा व्यक्तीला खिशातली एखादी नोट देवून टाळण्याचाच प्रयत्न होतो. मात्र यातूनच अशा प्रवृत्तींची हिमत वाढत जाते. पैसे न दिल्यास हातापायीवर येतात. यातून चांगल्या व्यक्तीलाही गुन्हेगार ठरावे लागते. अशीच घटना पांढरकवडा शहरात २४ फेब्रुवारीला सायंकाळी घडली. पंकज प्रकाश मडकाम (२४) रा.पोलीस स्टेशनमागे पांढरकवडा हा दोन भाऊ व आईसह राहात होता. मोठा भाऊ व आई यांच्यावरच कुटुंबाची जबाबदारी. वडील १५ वर्षापासून विभक्त राहतात. त्यातही सर्वात लहान भाऊ दिव्यांग असल्याने त्याच्यावरही विशेष लक्ष द्यावे लागते. अशाच कौटुंबिक पार्श्वभूमीचा पंकज हा वयात आल्यानंतर टवाळखोरीमुळे लवकरच चर्चेत आला. त्याच्यावर विनयभंगासह शरीर दुखापतीचेही गुन्हे पोलीस ठाण्यात दाखल आहेत. याच पंकजचा भाऊ प्रमोद याने त्याचा मित्र चंद्रशेखर माधव देशेट्टीवार (३५) रा.सोनबर्डी, कुणाल महादेव भगत (३३) रा.आखाडा वॉर्ड यांना २३ फेब्रुवारीला ड्राय-डेच्या दिवशी दारू पाजण्यासाठी तगादा लावला. यातून वाद झाला. प्रमोद परत आला. मात्र त्यानंतर पंकजने याच प्रकरणावरून कुणालला त्याच्या आॅटोमोबाईल्ससमोर मारहाण केली. हा प्रकार कुणालच्या चांगलाच जिव्हारी लागला. त्याने चंद्रशेखर, मित्र मिथून ऊर्फ तुळशीदास उईके (२५) रा.आंबेडकर वॉर्ड याला २४ ला सकाळी १० वाजता बोलावून घेतले. मारहाणीचा बदला घेण्याची खूनगाठ मनाशी बांधून कुणालने मार्केटमधील एका आॅटोमोबाईलमधून शॉकअपचा लोखंडी रॉड मागून घेतला. तिथून हे सर्वजण उमरीला गेले. कुणालने त्याचा साळा महेंद्र गोवर्धन राजगडकर (३२) रा.पिंपरी रोड याला सारा प्रकार सांगितला. त्यानंतर हे परत पांढरकवड्याला आले. त्यांनी मारोती ऊर्फ हर्षल बंडू पालकवार (२५) यालाही सोबत घेतले. ५ वाजताच्या सुमारास मृतक पंकज मरकाम आणि त्याचा मित्र विक्रम सुभाष जेदे हे दोघे बसस्थानक परिसरात फिरत असल्याचे आढळून आले. सूडाने पेटलेल्या कुणाल व त्याच्या सहकाऱ्यांनी पंकजचा पाठलाग सुरू केला. संशय आल्याने पंकज व त्याच्या सहकाऱ्यांनी बसस्थानक परिसरातील पडिक इमारतीत पळून जाण्याचा प्रयत्न केला. नेमके येथेच पंकजला व त्याच्या सहकाऱ्याला कुणालने गाठले. पंकजच्या डोक्यावर व तोंडावर लोखंडी रॉडने जबर मारहाण करण्यात आली. त्याचा सहकारी विक्रमला रॉड मारून तेथून हुसकावून लावण्यात आले. यानंतर आरोपींनी कोंघाऱ्याकडे पळ काढला. घटनेची माहिती जखमी विक्रमने पांढरकवडा पोलिसात दिली. यावरून ठाणेदार गुलाबराव वाघ यांनी तातडीने महाशिवरात्रीसाठी बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना सतर्क केले. कोंघारा परिसरात आरोपी कुणाल, चंद्रशेखर, मिथून यांना उपनिरीक्षक संजीव खंदारे यांनी अटक केली. त्यानंतर गुन्ह्याचा तपास उपनिरीक्षक संतोष माने यांच्याकडे सोपविण्यात आला. तपासादरम्यान आरोपी महेंद्र व मारोती या दोघांना १ मार्च रोजी अटक करण्यात आली. या कारवाईत गजानन होडगिर, सुरेश साबळे, शंकर बारेकर आदी कर्मचारी सहभागी झाले होते.
मारहाणीचा वचपा काढण्यासाठी मित्राला धाडले यमसदनी
By admin | Updated: March 5, 2017 01:01 IST