महसूलच्या रडारवर : ५० लाखांची कर वसुली होणार यवतमाळ : नगर परिषद हद्दीत असूनही केवळ दहा पैसे प्रति चौरस मीटर दराने अकृषक कर आकारणी करण्यात आल्याने आणखी पाच ले-आऊट महसूल विभागाच्या निदर्शनास आले आहे. या पाचही ले-आऊटला नोटीस बजावून त्यांच्याकडून सुमारे ५० लाख रुपयांच्या अकृषक कराची वसुली केली जाणार आहे. एका ले-आऊटचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर महसूल खात्याने यवतमाळ नगरपरिषद हद्दीतील आणखी काही ले-आऊटची तपासणी केली असता तब्बल पाच ले-आऊटला चार रुपये ६० पैसे ऐवजी दहा पैसे दराने अकृषक कर आकारणी झाल्याचे उघडकीस आले. ग्रामीण भागातील ले-आऊट असेल तर दहा पैसे प्रति चौरस मीटर दराने अकृषक कर आकारणी केली जाते. मात्र हेच ले-आऊट नगर परिषद हद्दीत असेल तर त्याचा दर चार रुपये ६० पैसे प्रति चौरस मीटर असा राहतो. यवतमाळ नगरपरिषदेची हद्दवाढ झाली. कालपर्यंत ग्रामीणमध्ये असलेले ले-आऊट नगर परिषद क्षेत्रात आले. मात्र त्यानंतरही ले-आऊट मालक व महसुलातील यंत्रणेच्या मिलीभगतमुळे केवळ दहा पैसे कर आकारणी कायम आहे. त्यात शासनाचे ५० ते ६० लाख रुपयांचे महसुलाचे नुकसान झाले आहे. आता या ले-आऊटकडून दहा पैसे नव्हे तर ४ रुपये ६० पैसे दराने अकृषक आकारणी करून कर वसुलीची तयारी महसूल विभागाने केली आहे. दर आकारणीतील हेतुपुरस्सर केलेल्या तफावतीची जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून नायब तहसीलदारामार्फत चौकशीही केली जात आहे. ४ एप्रिल २०१३ रोजी शासनाच्या नगरविकास विभागाने यवतमाळ नगरपरिषदेच्या पहिल्या हद्दवाढीची अधिसूचना जारी केली. त्यात यवतमाळच्या पूर्वेकडील सर्व्हे नं. २६, ३२, ३३, ४४, ४८, ५६, ५७, ५८, ५९, ६० चा समावेश करण्यात आला. दक्षिणेकडील सर्व्हे नं.६० (पश्चिमेकडे) ६१, ७२, ७३, ८९, यवतमाळच्या पश्चिमेकडील सर्व्हे नं. ८९ (उत्तरेकडे) व ५१ चा समावेश आहे. यवतमाळच्या उत्तरेकडील सर्व्हे नं. ५१, १९, २०, २१, २६ चा समावेश करण्यात आला आहे. नगरपरिषदेची कर वसुली ४ एप्रिल २०१३ च्या हद्दवाढीनंतर यवतमाळ नगर परिषद क्षेत्रात समाविष्ठ झालेल्या सर्व ले-आऊटकडून कन्व्हर्शन चार्जेस व डेव्हलपमेंट चार्जेस आकारला जाणार असून त्या रकमेची वसुली नगरपरिषदेकडून केली जाणार आहे. ही एकूण रक्कम कोटीच्या घरात जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी) असे आहेत पाच ले-आऊटधामणगाव ते नागपूर रोडवरील जुना बायपासवर एका शाळेला लागून गट क्र. २४/२ व २४/३ मध्ये (राज्य मार्ग क्र. ४ वर) एकाच परिवारातील दोन ले-आऊट आहेत. २८ आॅगस्ट २०१४ या एकाच दिवशी त्यांना अकृषक परवानगी मिळाली आहे. या दोनही ले-आऊटमध्ये अनुक्रमे ११६ व ११५ भूखंड (एकूण २३१ भूखंड) आहेत. या सर्व भूखंडांना केवळ दहा पैसे दराने अकृषक आकारणी केली गेली होती. मात्र हद्दवाढीमुळे तेथे चार रुपये ६० पैसे दर लावला जाणार असून ही रक्कम एकूण ३० लाख रुपयांच्या घरात जाणार आहे. नागपूर रोडवरच गट क्र. ७३/२ मध्ये १२ भूखंडांचे ले-आऊट असून त्याला ७ जानेवारी २०१४ ला अकृषक परवाना मिळाला आहे. राज्य मार्ग क्र. २९ वर हे ले-आऊट आहे. नागपूर रोडवर आरटीओ कार्यालयाच्या मागील बाजूला गट नं.४५/२, ४५-१-अ व ४५-१-अ/१ हे भलेमोठे ले-आऊट आहे. राज्य मार्ग क्र. १२ वर थाटल्या गेलेल्या या ले-आऊटला २७ फेब्रुवारी २०१५ रोजी अकृषक परवानगी मिळाली आहे. या ले-आऊटमध्ये तब्बल २५८ भूखंड आहेत. त्याची ४ रुपये ६० पैसे दराने कर आकारणीसुद्धा २५ ते ३० लाखांच्या घरात जाणार असल्याचे सांगण्यात आले. राज्य मार्ग क्र. १५ वर जामनकरनगर परिसरात गट क्र. ७३/३ मध्ये केवळ दोन भूखंडांचे ले-आऊट असून त्याला १२ एप्रिल २०१३ ला अकृषक परवाना मिळाला आहे. नगर परिषदेत ४ एप्रिल २०१३ नंतर नऊ ले-आऊट झाले.त्यातील पाच ले-आऊट हे काँग्रेसचे पदाधिकारी व बिल्डरचे आहेत. उर्वरित चार ले-आऊटला नियमानुसार आकारणी झाली.
अकृषक कराचा आणखी पाच ले-आऊटमध्ये घोळ
By admin | Updated: October 30, 2015 02:14 IST