लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वीज वितरण कंपनीत काम करताना तांत्रिक कामगारांच्या विविध समस्या आहेत. या समस्या सोडविण्यासाठी महावितरणकडून कोणतेही प्रयत्न होत नाही. त्यामुळे महावितरण प्रशासनाला जागे करण्यासाठी विभागीय व प्रविभागीय पातळीवर महाराष्ट्रात विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. ८ सप्टेंबरला सर्व मंडळ कार्यालयासमोर सकाळी १०.३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत एक दिवसाचे धरणे आंदोलन करण्याचे जाहीर करण्यात आले आहे.वीज कंपनीने या आंदोलनाची दखल न घेतल्यास मुंबई येथील प्रकाशगड मुख्यालयावर आंदोलन करण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे. तत्पूर्वी यवतमाळ येथील मुख्य कार्यालयासमोर ६ सप्टेंबर रोजी द्वारसभा घेण्यात आली. यावेळी अमरावती झोनचे सचिव दिनेश खाळे, सर्कल सचिव नितीन जयस्वाल, प्रवीण राजगुरे, मनोज ठाकरे, इंद्रकांत घुगरे, प्रशांत जुननकर या नेत्यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनात प्रशासनाचा निषेध नोंदविण्यात आला. आज ग्राहकांना सुरळीत लाईन हवी आहे. खंडित वीज प्रवाहामुळे ग्राहक हमरीतुमरीवर येतात. योग्य वीज पुरवठा होत नसेल तर बिल वसुलीही होत नाही. पोलीस केससंदर्भात प्रशासन आयत्यावेळी हात झटकते. आज सर्वत्र ट्रान्सफार्मर कॅपेसिटी, तारांची वहन क्षमता डिस्ट्रीब्यूशन बॉक्सची क्षमता वाढलेली आहे. तरी देखील या सर्व यंत्रणा जुन्याच आहे. त्यामुळे या यंत्रणेद्वारा वीज प्रवाह करताना भारनियमन नसतानासुद्धा भारनियमनसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. उच्च व लघुदाब वाहिन्या, ट्रान्सफार्मर, डिस्ट्रीब्यूशन बॉक्स कालबाह्य झाले आहे. अशा ठिकाणी प्राणांतिक अपघात रोज घडत आहेत. सणासुदीच्या काळात जुन्या तारांचा भुगा होऊन तारा तुटण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे प्राणांतिक अपघात झाल्यास लाईन स्टाफलाच दोषी धरत त्यांचा नाहक बळी प्रशासनाकडून घेण्यात येत आहे. या सर्व बाबींमध्ये सुधारणा घडवून आणण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन आयोजित केले आहे.
विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगारांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 22:06 IST
वीज वितरण कंपनीत काम करताना तांत्रिक कामगारांच्या विविध समस्या आहेत. या समस्या सोडविण्यासाठी महावितरणकडून कोणतेही प्रयत्न होत नाही.
विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगारांचे आंदोलन
ठळक मुद्देवीज वितरण कंपनीत काम करताना तांत्रिक कामगारांच्या विविध समस्या आहेत.