पतीच मारेकरी : ‘पीएम’ने बिंग फोडलेयवतमाळ : पत्नीने मुलीसह आत्महत्या केल्याचा कांगावा करीत ढसाढसा रडणारा पतीच खुनी निघाला. भोसा शिवारात चिमुकलीसह विवाहितेच्या आत्महत्याप्रकरणाला शवविच्छेदन अहवालाने वेगळीच कलाटणी दिली. पतीने दोरीने गळा आवळून पत्नीचा खून करून विहिरीत फेकले तर एक वर्षाच्या चिमुकलीला जिवंत फेकल्याची कबुली नराधम पतीने बुधवारी पोलिसांपुढे दिली. यवतमाळ शहरानजीकच्या भोसा शिवारात एका विहिरीत अर्चना शांताराम राऊत (३०) आणि निधी शांताराम राऊत (१) रा. महाजन ले-आऊट भोसा या दोन मायलेकींचे प्रेत आढळले होते. त्यावेळी घरगुती क्षुल्लक वादातून अर्चनाने चिमुकलीसह आत्महत्या केल्याचे पती शांतारामने पोलिसांना सांगितले होते. आपल्याला महिनाभरापासून काम नसल्याने पत्नी नेहमी भांडत होती. या भांडणातून तिने आत्महत्या केल्याचे सांगितले होते. मात्र पोलिसांनी पंचनामा करून प्रेत शवविच्छेदनासाठी पाठविल्यानंतर या प्रकरणातील वास्तव पुढे आले. शवविच्छेदन अहवालात अर्चनाचा खून दोरीने गळा आवळून झाल्याचे पुढे आले. त्यावरून पोलिसांनी चौकशीस प्रारंभ केला. पती शांताराम पुंडलिक राऊत याला ताब्यात घेतले. मात्र तो पत्नीने आत्महत्या केल्याचेच सांगत होता. शेवटी पोलिसी हिसका बसताच तो पोपटासारखा बोलू लागला. अर्चना नेहमीच भांडण करीत होती. तसेच महिनाभरापासून हाताला काम नव्हते. त्यातच १८ नोव्हेंबरला निधीचा वाढदिवस साजरा केला. त्यामुळे आर्थिक अडचण निर्माण झाली होती. काम नसल्याने अबोला धरुन ती नेहमीनेहमी माहेरी जायची, धमकी द्यायची. तिच्या या धमकीवर संतप्त होऊनच आपण हे कृत्य केल्याचे मारेकरी पती शांताराम याने पोलिसांपुढे उघड केले. पोलीस गजाआड करतील या भीतीने घटनेनंतर पुरावा नष्ट करण्यासाठी पत्नी अर्चनाचा मृतदेह तर मुलगी निधी हिला जीवंत विहिरीत फेकून दिले. त्यानंतर घाटंजी येथे निघून गेलो. तसेच बहिणीकडून बीसीचे पैसे आणण्याचे कारण त्यासाठी पुढे केल्याचेही तो यावेळी पोलिसांपुढे म्हणाला. त्याने घटनेची कबुली देताच पोलिसांनी त्याच्याविरुद्ध भादंवि ३०२ कलमान्वये खुनाचा गुन्हा नोंदवून अटक केली. गुरुवारी त्याला येथील न्यायालयापुढे हजर करण्यात येणार आहे. तसेच घटनेचे पुरावे गोळा करण्यासाठी कोठडी मागण्यात येणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)एक वर्षाच्या निधीला विहिरीत जिवंत फेकले पत्नीचा दोरीने गळा आवळून खून केल्यानंतर प्रेताची विल्हेवाट लावते वेळी चिमुकली निधीही शांतारामसोबत होती. अर्चनानंतर तिचा सांभाळ कुणी करावा या विचारातून तिलाही जीवंत विहिरीत फेकून कायमचे संपविल्याचे शांतारामने पोलिसांपुढे उघड केले. त्याच्या क्रूरतेची ही कहानी ऐकून क्षणभर पोलीसही अचंबित झाले. पोटच्या गोळ्याला त्यातही जिवंत असताना कुणी कसे काय विहिरीत फेकू शकतो या विचाराने पोलिसातच नव्हे तर जनसामान्यातही शांतारामबद्दल चिड व्यक्त होत आहे.
माता, चिमुकलीची आत्महत्या नव्हे खून
By admin | Updated: December 10, 2014 23:04 IST