महानिरीक्षकांची मंजुरी : तपास एसडीपीओंकडेयवतमाळ : पुसद विभागात आपल्या गुन्हेगारी कारवायांनी उच्छाद मांडणाऱ्या अंजूमन टोळीच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांनी ‘मोक्का’चे (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा) अस्त्र उपसले आहे. अमरावतीचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजीवकुमार सिंघल यांनी त्याला मंजुरी दिली आहे. अंजूमन खॉ लियाकत खॉ अली हा या टोळीचा म्होरक्या आहे. या टोळीमध्ये शेख मुख्तार शेख निजाम, इरफान खान हरुर खान, ईश्वर पोताराम राठोड, मो.समीर मो. कलीम, शेख हाफीज शेख कादर, संतोष नारायण गायकवाड हे सदस्य आहेत. ते सर्व पुसद येथील रहिवासी आहेत. त्यांच्यावर खंडाळा पोलीस ठाण्यात ११ आॅक्टोबर २०१५ रोजी भादंवि ३६४, ३९५ कलमान्वये गुन्हा दाखल आहे. आता त्यात मोक्काची भर पडली आहे. या गुन्ह्याचा तपास पुसदच्या उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. अंजूमन टोळीच्या पुसद विभागातील कारवाया बघता खंडाळाचे ठाणेदार डी.के. वडतकर यांनी या टोळीविरुद्ध ‘मोक्का’चा प्रस्ताव पोलीस महानिरीक्षक संजीवकुमार सिंघल यांच्याकडे सादर केला. त्याला मंजुरी देण्यात आली. हे आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यात त्यांना जामीन मंजूर झाला तरी मोक्कांतर्गत त्यांना कारागृहात स्थानबद्ध केले जाणार आहे. अंजूमन टोळीविरुद्ध पुसद येथील संजय माधव अहीरराव यांनी खंडाळा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. जवळा ते देवठाणा दरम्यान त्यांचे पैशासाठी अपहरण करण्यात आले होते. या टोळीने बहुतांश गुन्हे एकत्रितपणे केल्याने त्यांच्यावर ‘मोक्का’ लावण्यात आला. (जिल्हा प्रतिनिधी) अंजूमन टोळीवर तब्बल १५ गुन्हे अंजूमन टोळीवर गेल्या १० वर्षांत चोरी, जबरी चोरी, दरोडा, दंगा, अपहरण, खंडणी या सारखे १५ गुन्हे दाखल आहेत. पुसद शहर, दारव्हा, मंगरुळपीर, खंडाळा या ठाण्यातच या टोळीच्या कारवाया झाल्या आहेत. ही टोळी मोक्कांतर्गत स्थानबद्ध असल्याने पुसद विभागातील मालमत्तेचे गुन्हे नियंत्रणात येण्याची चिन्हे आहे. पुसदच्या अंजूमन खॉ टोळीच्या कारवाया वाढल्या होत्या. त्याला लगाम लावण्यासाठीच या टोळीवर ‘मोक्का’ लावण्यात आला. त्यांची संघटित गुन्हेगारीची पद्धत पाहूनच महानिरीक्षकांनी मोक्काच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. - डी.के. वडतकर, ठाणेदार, खंडाळा
पुसदच्या अंजूमन टोळीवर ‘मोक्का’
By admin | Updated: February 5, 2016 01:59 IST