शेतमाल उघड्यावर : बाजार समित्यांचे शेड फुल्ल, ताडपत्र्या झाकून तात्पुरती सोय लोकमत न्यूज नेटवर्क नेर/बाभूळगाव : पावसाचे वातावरण असतानाही कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी उपाययोजना केल्या नाही. परिणामी दुपारी झालेल्या पावसामुळे तूर मोठ्या प्रमाणात भिजली. नेर आणि बाभूळगाव येथे झालेल्या या प्रकारामुळे मोठे नुकसान झाले आहे. नेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या तुरीची आवक मोठ्या प्रमाणात आहे. वारंवार मुदतवाढ मिळाल्यानंतरही शेतकऱ्यांची तूर विक्रीसाठी येत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे शेड खुले आहेत. त्यामध्ये विक्रीसाठी आलेली तूर ठेवण्यात आली. पावसामुळे खुली असलेली ही तूर ओली झाली. पोत्यात बांधून असलेल्या तुरीलाही फटका बसला. दरम्यान, ओली झालेली तूर खरेदी करण्याची तयारी दर्शविली आहे. बाभूळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने काही खासगी गोडावून भाड्याने घेतले आहे. बुधवारी शेतकऱ्यांची तूर मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आली. तूर खरेदी सुरू असतानाच दुपारी जोरदार पाऊस झाला. यामध्ये उघड्यावर असलेली हजारो क्विंटल तूर भिजली गेली. बाजार समितीने बोलाविले नसतानाही काही शेतकऱ्यांनी आपल्या तुरी आणून टाकल्या. यामुळे बाजार समितीची तारांबळ उडाली. ओल्या झालेल्या तुरीचे पोते बदलवून टाकण्याच्या सूचना तहसीलदार दिलीप झाडे यांनी केल्या. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याचे पाहून तहसीलदार झाडे यांनी शेतकऱ्यांची समजूत काढली.
नेर व बाभूळगावात पावसाने तुरी भिजल्या
By admin | Updated: June 1, 2017 00:17 IST