दोन वर्षे लोटली : समस्या जैसे थे, आश्वासनांची पूर्तता नाही आर्णी : ‘चाय पे चर्चा’ या कार्यक्रमातून देशभरातील शेतकऱ्यांशी संवाद साधणाऱ्या नरेंद्र मोदी यांनी दाभडीचाही कायापालट करण्याची ग्वाही दिली होती. परंतु या कार्यक्रमावरून दोन वर्षे लोटली, मात्र दाभडी गावाचा विकास झाला नाही. हे गाव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने आपली दोन वर्षे पूर्ण केल्यानंतरही उपेक्षितच असल्याचे विदारक चित्र पहायला मिळत आहे. सन २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी आर्णी तालुक्यातील दाभडी (जि. यवतमाळ) या गावाला भेट दिली होती. या गावात ‘चाय पे चर्चा’ हा कार्यक्रम आयोजित करून त्याद्वारे देशाच्या कानाकोपऱ्यातील शेतकऱ्यांशी मोदी यांनी संवाद साधला होता. तुमचे जीवनमान बदलून टाकू, अशी हमी त्यांना दिली होती. मात्र आजही शेतकऱ्यांची स्थिती जैसे थे आहे. ज्या दाभडी गावात हा कार्यक्रम झाला, त्या गावकऱ्यांनाही मी तुमच्या पाठीशी आहे, तुमचा सर्वांगीण विकास करू, असे सांगितले गेले होते. या कार्यक्रमावरून आणि देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सरकार येऊन दोन वर्षे गुरुवारी पूर्ण झाली. परंतु दाभडी गावाचा कोणताच विकास झाला नाही. या गावातील समस्या आजही जैसे थे आहे. (शहर प्रतिनिधी) मंत्री-आमदारांचीही घोषणा हवेत विरली१३ मार्च २०१५ रोजी चंद्रपूर-आर्णीचे खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी पत्रपरिषद घेऊन महाराष्ट्र शासन दाभडी गाव दत्तक घेणार असल्याचे जाहीर केले होते. त्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपणास फोन करून ही माहिती दिल्याचे ना. अहीर यांनी पत्रकारांना सांगितले होते. दाभडीच्या विकासासाठी अनेक घोषणाही केल्या गेल्या होत्या. एवढेच नव्हे तर यवतमाळचे भाजपा आमदार मदन येरावार यांनीसुद्धा थेट दाभडीचे तत्कालीन सरपंच संतोष टाके यांच्याशी संपर्क करून दाभडी विकासाचा आराखडा तयार करण्याच्या सूचना ग्रामपंचायतीला दिल्या होत्या. ग्रामपंचायतीने आपल्या समस्यांची गाथा रातोरात येरावार यांच्याकडे पोहोचविली. ही गाथा मुख्यमंत्र्यांपर्यंत स्वत: पोहचवून दाभडी विकासाचे आश्वासन येरावार यांनी सरपंच व गावकऱ्यांना दिले होते. मात्र आज दोन वर्षे लोटल्यानंतरही दाभडीत विकासाचे तीन-तेरा वाजले आहे. ना. अहीर, आमदार येरावार यांना आपण दिलेल्या आश्वासनांचा विसर पडल्याचे दिसून येते. त्यामुळे मोदी सरकार, आपले खासदार-मंत्री, आमदार यांच्या घोषणा फसव्या असल्याची भावना दाभडीवासीयांमध्ये निर्माण झाली आहे.
मोदींच्या ‘चाय पे चर्चा’तील दाभडी गाव उपेक्षितचं !
By admin | Updated: May 27, 2016 02:07 IST