उमरखेड पोलिसांची कारवाई : वन विभाग संशयाच्या भोवऱ्यातउमरखेड : तालुक्यातील कृष्णापूर वनवर्तुळातील सागवान तस्करीप्रकरण गाजत असतानाच वन विभागाच्या नाकावर टिचून उमरखेड पोलिसांनी तेलंगणात लाखो रुपयांचे सागवान घेऊन जाणारा मेटॅडोअर पाठलाग करून बुधवारी सकाळी ८ वाजता पकडला. उमरखेड पोलिसांनी केलेल्या या कारवाईने वन विभागाचे कर्मचारी मात्र संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे. उमरखेड - हदगाव मार्गावर सकाळी ८ वाजताच्या सुमारास एम.एच.२६/९१९४ हा मेटॅडोअर जात होता. त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक सुरज बेंडे, वाहतूक शिपाई मधुकर राठोड यांना संशय आला. त्यामुळे या तिघांनी सुमारे पाच किलोमीटर पाठलाग करून चिंचोली फाट्यावर मेटॅडोअर अडविला. तपासणी केली असता गाडीच्या मागच्या बाजूला भुसा भरलेला होता आणि मधल्या भागात सागवानाचे ५५ नग आढळून आले. त्याचवेळी चालकाला ताब्यात घेऊन मेटॅडोअर उमरखेड पोलीस ठाण्यात आणला.या प्रकरणातील मुख्य आरोपी शबीर व फईम दोघेही दुचाकीने पसार झाले. पोलिसांनी पाठलाग करूनही हाती लागले नाही. दरम्यान, पोलीस ठाण्यात मेटॅडोअर आणल्यानंतर वन विभागाला माहिती देण्यात आली. वन विभागाचे फिरते पथक प्रमुख के.पी. धुमाळे उमरखेडला दाखल झाले. ५५ नग सागवान जप्त करण्यात आले. तसेच वाहनचालक शेख मिरात शेख मेहबूब रा.उमरी रेल्वे ता.भोकर जि.नांदेड याला ताब्यात घेतले. शासकीय मूल्यानुसार या सागवानाची किमत १ लाख २२ हजार आणि वाहनाची किमत दीड लाख असा दोन लाख ७२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर सागवान खंडाळा जंगलातील कक्ष क्र.४०० मधील असल्याची कबुली वाहनचालकाने दिली. विशेष म्हणजे सकाळी ८ वाजता वन विभागाच्या वन उपज तपासणी नाक्यावर कुणीही हजर नव्हते. मात्र पोलिसांच्या सतर्कतेने सागवान तस्करी पकडण्यात आली. या परिसरात अशाप्रकारे मौल्यवान सागवानची तस्करी नेहमीचीच आहे. एखाद-दुसऱ्या घटनेतच कारवाई होते. कृष्णापूर बीटमधील सागवान तोडप्रकरणात वन अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई होत असतानाच भरदिवसा सागवान घेवून जाणारा मेटॅडोअर पोलिसांनी जप्त केला. त्यामुळे वन विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह लागले आहे. (शहर प्रतिनिधी)
तेलंगणात जाणारे लाखोंचे सागवान जप्त
By admin | Updated: October 8, 2015 02:17 IST