तणावपूर्ण शांतता : एसआरपीएफ व पोलिसांचा चोख बंदोबस्त पुसद : येथील हनुमान वॉर्डात शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास काही जणांनी तुफान दगडफेक केल्याने शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने परिस्थिती नियंत्रणात आली. राज्य राखीव दलाच्या जवानांसह पोलिसांना तैनात करण्यात आले असून शहरात तणावपूर्ण शांतता आहे. पुसद शहरातील हनुमान वॉर्डात रात्री दगडफेक करण्यात आली. यामुळे या परिसरात तणाव निर्माण झाला. या घटनेची माहिती मिळताच शहरचे ठाणेदार वाघू खिल्लारे यांनी ताफ्यासह घटनास्थळ गाठले. पोलीस पाहून दगडफेक करणारे पसार झाले. पोलिसांनी परिसरात शोधमोहीम घेतली. परंतु कोणीही आढळून आले नाही. दरम्यान, येथील माळीपुरा परिसरात ५ व ६ एप्रिलच्या रात्री दगडफेक झाल्याची घटना समोर आली. अपर पोलीस अधीक्षक डॉ.काकासाहेब डोळे यांनी शनिवारी दुपारी घटनास्थळाची पाहणी केली. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सूचना दिली. दरम्यान, या प्रकरणी १७ जणांविरुद्ध दंगलीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. दरम्यान शुक्रवारी सायंकाळी माळीपुरा परिसरात पुन्हा दगडफेक झाली. त्यामुळे पोलिसांनी २० ठिकाणी फिक्स पॉइंट बंदोबस्त लावलेला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी अजय बन्सल आणि ठाणेदार वाघु खिल्लारे परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. (प्रतिनिधी)
पुसदमध्ये मध्यरात्री दगडफेक
By admin | Updated: April 9, 2017 00:54 IST