यवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय माहाविद्यालयातील मेडिकल बोर्डाचा कारभार ढेपाळला असून शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांना लागणाऱ्या फिटनेस प्रमाणपत्रासाठी येथे ‘तारीख पे तारीख’ मिळत आहे तर अनेक कर्मचाऱ्यांना बोर्डांची तारीख निघून गेल्यानंतर उपस्थित राहण्याचे पत्र मिळते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वैद्यकीय मंडळाकडे वाशिम, अमरावती आणि यवतमाळ या तीन जिल्ह्याचा कारभार आहे. येथे फिटनेस प्रमाणपत्रासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांचीही संख्या अधिक आहे. शिवाय याच मंडळाकडे अपंग प्रमाणपत्र वितरण आणि तपासणीचीही प्रकरणे चालतात. त्यामुळे येथे योग्य नियोजन करण्याची गरज आहे. वैद्यकीय मंडळाच्या नियोजनशून्यतेमुळे अनेक कर्मचाऱ्यांना शासनाच्या विविध लाभापासून वंचित राहावे लागते. फिटनेस प्रमाणपत्र नसल्याने पूर्ववत सेवेत रूजू होता येत नाही. रूजू झाल्यानंतरही मिळालेल्या मुदतीत हे प्रमाणपत्र सादर करता येईलच याची शाश्वती राहत नाही. कर्मचाऱ्यांच्या फिटनेस प्रमाणपत्रासाठी विविध शासकीय कार्यालयातून वैद्यकीय मंडळाकडे पत्र पाठविले जाते. या पत्रावर वैद्यकीय मंडळ तपासणीची तारीख संबंधित कर्मचाऱ्यांना देते. या तारखेला आल्यानंतर तपासणी करून त्याचा फिटनेस प्रमाणपत्र दिले जाते. मात्र या प्रक्रियेत भरपूर वेळ जात असून कोणतेच नियोजन नाही. अनेकदा वैद्यकीय बोर्डाची तारीख निघून गेल्यानंतर कर्मचाऱ्याच्या हाती उपस्थित राहण्याचे पत्र पडते. अशास्थिती पुन्हा वेटींगवर राहण्याची वेळ या कर्मचाऱ्यावर येते. सर्व प्रक्रिया सुरूवातीपासून करावी लागते. तपासणीनंतर अनेक प्रमाणपत्र केवळ अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीसाठी कित्येक महिने पडून असतात. शासकीय कर्मचाऱ्यांना वेळ हे प्रमाण पत्र मिळविण्यात खर्च होत आहे. शिवाय आर्थिक फटकाही सहन करावा लागत आहे.शासकीय कार्यालयातून कोणत्याही कारणासाठी रजेवर असलेल्या कर्मचाऱ्याला वैद्यकीय मंडळाचे फिटनेस प्रमाणपत्र सादर करण्याची सक्ती केली जाते. त्या शिवाय कामावर रुजू करून घेतले जात नाही. वैद्यकीय रजेवर असल्यानंतर फिटनेस प्रमाणपत्र घेणे अपेक्षित आहे. मात्र तसा कोणताच संबंध नसताना हे प्रमाण पत्र मिळवावे लागत आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना नाहक मनस्ताप सोसावा लागत आहे. राज्य नर्सेस व आरोग्य कर्मचारी संघटनेचे राज्य सरचिटणीस अशोक जयसिंगपुरे यांनी आरोग्य मंत्र्याकडे याची तक्रार केली आहे. (कार्यालय प्रतिनिधी)कित्येक महिने प्रतीक्षाच ४फिटनेस प्रमाणपत्रासाठी तपासणी झाल्यानंतर केवळ अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीसाठी कित्येक महिने पत्रच मिळत नाही. अमरावती आणि वाशिम येथील कर्मचाऱ्यांना आर्थिक भूर्दंड सोसून यवतमाळ गाठावे लागत असल्याचे दिसते.
मेडिकल बोर्डाची कर्मचाऱ्यांना ‘तारीख पे तारीख’
By admin | Updated: December 8, 2015 03:28 IST