वडगावातील घटना : आरोपी मुलकीतीलयवतमाळ : उसणवारीतील २०० रुपयांच्या वादात विहीर खोदणाऱ्या एका मजुराचा चाकूने छातीत वार करून निर्घृण खून करण्यात आला. ही घटना गुरुवारी सायंकाळी आर्णी रोडवरील वडगाव ग्रामपंचायतनजीकच्या वडारवाडी चौकात घडली. आशिष गजानन शेडमाके (२६) रा. वडगाव असे मृताचे नाव आहे. तो अन्य साथीदारांसह राणाप्रतापनगर येथील विहीर खोदण्यासाठी गेला होता. तेथून घरी परतल्यानंतर ते सर्व जण पुन्हा वडारवाडी समोरच्या चौकात आले. त्याचवेळी मुलकी परिसरातील दांडेकर ले-आऊटमध्ये राहणारा प्रवीण उर्फ माट्या तेथे आला. त्याने उधारीच्या २०० रुपयावरून आशिष सोबत वाद घातला. बराच वेळपर्यंत त्यांच्यातील वाद सुरू होता. यावेळी आशिषचे अन्य मजूर मित्र बाजूलाच टपरीवर गेले होते. त्यावेळी वाद विकोपाला गेल्याने प्रवीणने आशिषच्या छातीत चाकूने भोसकले. यात गंभीर जखमी झालेल्या आशिषचा मृत्यू झाला. या प्रकरणी वडारवाडी येथील योगेश गायकवाड याने वडगाव रोड पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली. त्यावरून पोलिसांनी प्रवीण उर्फ माट्याविरुद्ध भादंविच्या ३०२ कलमान्वये गुन्हा दाखल केला. यावेळी फिर्यादीने वेळोवेळी आरोपींचे आडनाव बदलविल्याने पोलिसांची चांगलाच गोंधळ उडाला. (कार्यालय प्रतिनिधी)
२०० रुपयांसाठी मजुराचा चाकूने खून
By admin | Updated: May 6, 2016 02:12 IST