लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरात एमडी ड्रग्जचा व्यापार करणारे मोठे रॅकेट सक्रिय आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ८८.१० ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त केल्याने नशेच्या व्यापारावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. उपराजधानीतून एमडी ड्रग्जची खेप येत असल्याची माहिती पुढे येत असून, पोलिसांपुढे नेटवर्क शोधून काढण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.
सात ते आठ हजार रुपये प्रति ग्रॅम असलेले एमडी ड्रग्ज मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्यात येत आहे. युवापिढीतून सर्वाधिक मागणी होत असल्याने विक्री करणारे मोठे रॅकेटच शहरासह जिल्ह्यात तयार झाले आहे. यापूर्वी एलसीबीने तीन ते चार कारवाया करून मोठ्या प्रमाणात एमडी ड्रग्जही जप्त केले होते. काही आरोपी ताब्यात घेतले होते. पोलिसांनी सुरुवातीला या प्रकरणाचा चौफेर तपास केला. मात्र, त्यानंतर हाती काहीच न लागल्याने एमडी ड्रग्जचे प्रकरण थंडबस्त्यात गेले. एलसीबीने सोमवारी कारवाई करून एमडी ड्रग्जसह दोघांना अटक केली. त्यामुळे पुन्हा एकदा एमडी ड्रग्जचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
एमडी ड्रग्ज आणण्यासाठी दुचाकीचा वापरनाशिक आणि पुणे येथील एमडी ड्रग्जच्या कारवाया राज्यात चर्चेच्या ठरल्या होत्या. नागपूर येथेही एमडी ड्रग्जचे मोठे जाळे आहे. एमडी ड्रग्ज ग्रॅममध्येच खरेदी-विक्री केले जाते. मोठे वाहन अनेकदा अडवून तपासले जाते. दुचाकीवर असल्यास फारशी तपासणी होत नाही. हीच बाब हेरून एमडी ड्रग्जची खेप दुचाकीने आणली जात असल्याचे सांगण्यात येते. यवतमाळातही एमडी ड्रग्जची तस्करी अशाच पद्धतीने सुरू आहे.
टीप मिळाली तरच कारवाईयवतमाळात महिन्याकाठी एमडी ड्रग्जमधून मोठी उलाढाल होत आहे. पोलिस मात्र टीप मिळाल्यानंतरच कारवाई करीत असल्याचे चित्र आहे. ग्राहकही ठरलेले असल्याने खरेदी-विक्रीबाबत फारशी चर्चा होत नाही. नवीन ग्राहकाला ड्रग्जची विक्री टाळली जाते. नशेचा हा व्यापार अगदी शांतपणे केला जात आहे. पोलिसांनी खोलवर जाऊन तपास केल्यास एमडी ड्रग्जचे मोठे घबाड हाती लागण्याची शक्यता आहे. मुंबईसह नागपूर येथून एमडी ड्रग्जचा पुरवठा होतो. त्यामुळे पुरवठा करणारे आणि शहरात रॅकेट चालविणारे 'ते' कोण याचा पर्दाफाश करण्यात पोलिस यशस्वी होतात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.