साडेपाच तास : ३0 सप्टेंबरच्या पटसंख्येवर नवीन संचमान्यतायवतमाळ : मागीलवर्षी जिल्ह्यातील अनेक शाळांनी ‘सरल’मध्ये विद्यार्थी टाकताना चुका केल्या. परिणामी संचमान्यता चुकीच्या झाल्या. त्यामुळे यावर्षी शाळांनी विद्यार्थी पोर्टल काळजीपूर्वक भरावे, याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी माध्यमिक शिक्षण विभागाने साडे पाच तासांची मॅराथान बैठक घेतली. येथील नंदुरकर विद्यालयात ही बैठक झाली. जिल्ह्यातील माध्यमिक विद्यालयांचे मुख्याध्यापक बैठकीत सहभागी होते. दुपारी १२ वाजता सुरू झालेली ही बैठक मिनीटभराचीही विश्रांती न घेता सायंकाळी ५.३0 वाजता संपली. अमरावती विभागीय शिक्षण मंडळाचे धुर्वे, शाखा प्रमुख बोधनकर, वरिष्ठ अधीक्षक किनाके यांनी मंडळाशी संबंधित विषयांवर मार्गदर्शन केले. उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन ९0 टक्के सदोष असल्याची खंत किनाके यांनी व्यक्त केली. शिक्षकांनी मंडळाच्या कामात सहकार्य करून मंडळाची प्रतिमा मलीन होऊ नये, यासाठी खबरदारी घेण्याचे आवाहन केले. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ.गावंडे, निरंतर शिक्षणचे उपशिक्षणाधिकारी किशोर सोने यांनी शैक्षणिक प्रगत महाराष्ट्र संकल्पना स्पष्ट केली. उपशिक्षणाधिकारी रोहणे, विस्तार अधिकारी मडावी यांनी आम आदमी योजना, मानव विकास मिशन, टंचाईग्रस्त गावातील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क प्रतीपूर्ती योजनेबाबत मार्गदर्शन केले. विज्ञान पर्यवेक्षिका गावंडे यांनी विज्ञान प्रदर्शन, इन्सपायर अवार्ड, विविध शिष्यवृत्ती परीक्षांची माहिती दिली. चंद्रभान वहाणे यांनी कनिष्ठ महाविद्यालय पटपडताळणी, एटीकेटी प्रवेश, तर अनिल शेंडगे यांनी ईबीसी सवलत योजनेची माहिती दिली. शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांनी संगणक तज्ज्ञ चितळकर यांच्या सहकार्याने अल्पसंख्यक शिष्यवृत्ती, सरल योजना, विद्यार्थी पोर्टल आदींची प्रात्याक्षिकासह माहिती दिली. ३0 सप्टेंबरनंतर नोंदविलेल्या विद्यार्थ्यांची संख्या संचमान्यतेसाठी ग्राह्य धरली जाणार नाही. त्यामुळे शाळांनी कोणत्याही स्थितीत तत्पूर्वी सरलचे काम पूर्ण करावे, अशी तंबी त्यांनी दिली. विद्यार्थी नोंदविले न गेल्यास शाळांमधील शिक्षकांची पदे कमी मान्य झाल्यास, त्याला संबंधित मुख्याध्यापकच जबाबदार राहतील, असा गर्भीत इशाराही त्यांनी दिला. (शहर प्रतिनिधी)बाल विज्ञान भवन निरूपयोगीमानव विकास मिशनअंतर्गत काही तालुक्यात बाल विज्ञान भवनची निर्मिती करण्यात आली. या बाल भवनाला विद्यार्थी भेटीच देत नाही. त्यामुळे ते निरूपयोगी ठरले आहे. खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनी याबद्दल नाराजी व्यक्त केल्याचे बैठकीत कबूल करण्यात आले. आॅक्टोबरमध्ये राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानांतर्गत जिल्हा कला महोत्सव घेण्यात येणार आहे. त्यात विद्यार्थ्यांना नृत्य, चित्रकला व हस्तकला सादर करण्याची संधी मिळेल. त्याचा शाळांनी लाभ घेण्याची सूचनाही करण्यात आली.
शिक्षणची मॅराथॉन बैठक
By admin | Updated: October 2, 2016 00:26 IST