- विशाल सोनटक्के, यवतमाळ आधुनिक काळात वृद्धाश्रमाची संख्या वाढत आहे. याची गरज मी जाणतो, ओळखतो. तरीही माझे म्हणणे आहे, सुरक्षित आणि सहायक वातावरण निर्माण करून आपण आपल्या घरालाच वृद्धाश्रम बनविल्यास तो खऱ्या अर्थाने वयोवृद्ध आई-वडिलांसाठी आनंदआश्रम ठरेल, असे विवेचन प्रसिद्ध आध्यात्मिक संत मोरारीबापू यांनी केले.
डॉ. विजय दर्डा, राजेंद्र दर्डा आणि दर्डा परिवाराच्या वतीने यवतमाळ येथील चिंतामणी बाजार समितीच्या आवारात आयोजित रामकथा पर्वाच्या पाचव्या दिवशी बुधवारी ते बोलत होते.
रामचरितमानसमध्ये नऊ ग्रहांचे वर्णन आहे. हे ग्रह नव्हे तर गुरू आहेत. आकाशात नऊ ग्रह आहेत. कधी-कधी त्यांची युती होते, वियोग होतो हे खगोलशास्त्र आहे; पण शरणागतांसाठी ग्रहांपेक्षा गुरूची आवश्यकता जास्त आहे. पहिला ग्रह म्हणजे आई लेकराला जिथे जन्म देते ते मातृगृह, तर संपूर्ण घरालाच पितृगृह म्हणतात. या दोघांचा आदर करायला हवा. प्रत्येकाने लहान मुलांसाठी बालमंदिर, संस्कारयुक्त तरुणांसाठी युवा मंदिर, ज्येष्ठांना सेवा मिळेल असे वृद्धाश्रम आणि जिथे मौन, वैराग्य, साधना करता येईल, असे संन्यासाश्रम घरामध्येच उभारले पाहिजे, यातून ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास मिळून आपले घरच आध्यात्मिक विश्वविद्यालय होईल, असे ते म्हणाले.
गुरू लेझर नाही मेजर ऑपरेशन करतो
गुरू मनाचा ज्ञाता आणि निर्मातादेखील आहे. तो लेझर ऑपरेशन करीत नाही, तर मेजर ऑपरेशन करतो, गुरू सान्निध्यामुळे हळूहळू वैराग्य प्राप्त होते. मिथ्या, सत्य, सार्थक काय आहे समजते आणि माणूस आतल्या आत पुढे जातो, अशा शब्दांत मोरारीबापू यांनी गुरू महिमा कथन केला.
बंधन नव्हे, तर आध्यात्मिक यात्रा : डॉ. विजय दर्डा
पती-पत्नी यांच्यातील संबंध केवळ बंधन नव्हे तर ती आध्यात्मिक यात्रा आहे. विवाहाचा अर्थ केवळ एकत्र राहणे नव्हे, तर परस्परांच्या जीवनात सहकारी, साधन आणि सहयात्री होणे आहे. आध्यात्मिक दृष्टिकोनातून पती-पत्नीला केवळ शरीर म्हणून न पाहता आत्मा म्हणून पाहायला हवे, शक्ती मानून सन्मान द्यायला हवा, तेव्हाच जीवनात संतुलन येईल, असे सांगत लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन तथा कथापर्वचे यजमान डॉ. विजय दर्डा यांनी सुफियाना शेर ऐकविला. ‘इश्क में जब रंग ए हुस्न समा जाए, हर दर्द में राहत का पता चल जाए, दिल से दिल की बात जुड जाए, सुफी की राहों में सुकून बिखर जाए.’