कळंब : दारिद्र्य रेषेखालील लाभार्थ्यांना दिले जाणारे घरकूल योजनेचे अनुदान परस्पर कर्जवसुली म्हणून कापले जात आहे. हा धक्कादायक आणि सुलतानी प्रकार येथील सेंट्रल बँकेसह इतर राष्ट्रीयीकृत बँकेने अवलंबला आहे. याविषयी लाभार्थ्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. दारिद्र्य रेषेखालील आणि अतिशय गरीब कटुंबासाठी शासनाने घरकूल व शौचालय बांधकामाची योजना सुरू केली. या योजनेचा निधी राष्ट्रीयीकृत बँकेमध्ये संबंधित लाभार्थ्यांच्या नावे जमा होतो. घरकूल बांधकामाच्या प्रगतीनुसार अनुदान टप्याटप्याने बँकेत जमा केले जाते. ही रक्कम उचलून लाभार्थ्यांने बांधकाम पूर्ण करावे, हा शासनाचा उद्देश आहे. परंतु कर्जदार लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा होताच ती संबंधित बँका कर्जाचा हप्ता भरण्यासाठी वळती करत आहे. यासाठी बँकेकडून दबावतंत्र वापरले जाते. ग्रामीण भागातील आणि अशिक्षित लाभार्थ्यांनाही याचा मोठा फटका बसत आहे. पहिल्या टप्प्यातील घरकुलाचे बांधकाम पूर्ण न केल्यास पुढील बांधकामासाठी निधी मिळत नाही तर, दुसरीकडे बँकेचे अधिकारी कर्जाची सक्तीने वसुली करीत आहे. या प्रकारामुळे शासकीय योजनेला हरताळ फासला जात आहे. बांधकामाचे पैसे कर्जात वसूल केल्याने घर कसे पूर्ण करणार, हा प्रश्न आहे. त्यामुळे घरकूल व शौचालय बांधकाम या योजनेच्या यशस्वीतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बँकेच्या या सुलतानी कारभाराचा फटका अंतरगाव येथील अजाब कुमरे, माणिक पराते, शामराव कुमरे, तानी टेकाम यांच्यासह अनेक गावातील लाभार्थ्यांना बसला आहे. यासंबधीची तक्रार डोंगरखर्डा येथील नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. यावर काय निर्णय होतो याकडे लक्ष लागले आहे. (तालुका प्रतिनिधी)
घरकूल अनुदानातून कर्ज वसुली
By admin | Updated: December 9, 2014 22:58 IST