पुसद : रक्तदान म्हणजे जीवनदान असे म्हटले जाते. नेमक्या गरजेच्या वेळी एखादा विशिष्ट रक्तगटाचा रक्तदाता न मिळाल्यास रक्ताअभावी रुग्णाच्या जीवावर बेतण्याचे अनेक प्रसंग आपल्या अवतीभवती घडत असल्याचा अनुभव आहे. अगदी हीच बाब हेरून आता रक्तदात्यांची माहिती देणारे ‘लाईफ सेव्हर’ नामक अॅन्ड्राईड मोबाईल अॅप विकसित करण्यात अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याला यश आले आहे. सारंग भंडारी हे विद्यार्थ्यांचे नाव असून तो स्थानिक बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालयाचा संगणक विज्ञान शाखेतील तृतीय वर्षाचा विद्यार्थी आहे.प्रस्तुत प्रतिनिधीने या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, विविध गटाचे रक्त रुग्णांना वेळेवर मिळावे हा अॅप विकसित करण्यामागचा उदात्त हेतू असल्याचे सांगत गुगल प्ले-स्टोअरवर हे मोबाईल अॅप उपलब्ध असल्याची माहिती सारंगने दिली. हा अॅप लोकाभिमुख होवून त्याची उपयोगीता वाढविण्याकरिता वेबसाईटसुद्धा लवकरच उपलब्ध करून देण्याचा मानस हस्तमुखाने सारंग भंडारी याने व्यक्त केले. अॅपचे मॉडेल हे अनेक अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये आयोजित नॅशनल लेव्हल स्टुडंट इव्हेन्टसमध्ये विजेता ठरले असून या यशाबद्दल संस्थाध्यक्ष जय नाईक, तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉ.सलिम आमदानी व कर्मचारीवृंदासह मित्रांनी सारंगचे कौतुक केले आहे. अनेकजण रक्तदानासाठी इच्छुक असतात, परंतु गरजुंना वेळेवर ते रक्त देण्यासाठी उपलब्ध होत नाही, ही अडचण आता दूर होणार आहे. या अॅपच्या माध्यमातून रक्तदात्यांची रक्तगटासह माहिती उपलब्ध होणार असल्याने गरजूंना याचा मोठा फायदा होणार, हे मात्र तितकेच खरे. (प्रतिनिधी)
आता रक्तदात्यांची माहिती देणारे ‘लाईफ सेव्हर’ उपलब्ध
By admin | Updated: March 20, 2015 01:55 IST