पांढरकवडा न्यायालय : दोन वर्षांपूर्वीची वणीतील घटना पांढरकवडा : आपल्या सहकारी मजुराचा क्षुल्लक कारणावरून खून केल्याप्रकरणी येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम.पी.डोरले यांनी महारू ऊर्फ मंगल मडावी व शत्रुघ्न धर्मू मडावी या दोघांना भादंवि कलम ३०२ प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा तसेच प्रत्येकी दोन हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास सहा महिने सक्तमजुरी तसेच कलम २०१ अंतर्गत प्रत्येकी पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व एक हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली. वणी येथील लालगुडा परिसरातील ताटेवार ले-आउटमध्ये नथ्थूजी जांभुळकर यांच्या घराचे कंत्राटदार जयपाल मडके यांच्या माध्यमातून मजुरांकरवी बांधकाम करून घेतले जात होते. सदर कामावर आरोपी महारू ऊर्फ मंगल मडावी तसेच शत्रुघ्न धर्मू मडावी आणि मृतक रणजीत मडावी व मुकेशकुमार शामलाल ठाकूर हे मजूर काम करीत होते. १७ मे २०१५ रोजी रात्री १०.३० ते ११ वाजताच्या सुमारास आरोपी महारू ऊर्फ मंगल मडावी, शत्रुघ्न व मृतक रणजीत यांच्यात पैशाच्या देवाण-घेवाणीवरून वाद झाला. या वादात महारू व शत्रू यांनी लाकडी राफ्टरच्या सहाय्याने रणजीतवर हल्ला केला. यात रणजीतच्या डोक्याला जबर मार लागून त्याचा मृत्यू झाला. या दोघांनी त्याचा मृतदेह कंपाउंडबाहेर टाकला. ही घटना मुकेशकुमार ठाकूर याने प्रत्यक्ष पाहिली व त्याची सूचना त्याने घर मालक प्रवीण जांभुळकर यांना दिली होती. प्रवीण जांभुळकर यांच्या तक्रारीवरून वणी पोलिसांनी भादंवि कलम ३०२, २०१ (३४) अन्वये गुन्हा नोंदविला. तत्कालीन ठाणेदार असलम खान पठाण यांनी गुन्ह्याचा तपास करून प्रकरण न्यायप्रविष्ट केले. या खटल्यात सरकारी पक्षातर्फे १३ साक्षीदारांचे बयाण नोंदविण्यात आले. यात प्रत्यक्षदर्शी साक्षीदारासह परिस्थितीजन्य पुरावे महत्त्वाचे ठरले. सरकारी पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता प्रशांत मानकर यांनी बाजू मांडली. त्यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून दोन्ही आरोपींना न्यायालयाने शिक्षा ठोठावली. (तालुका प्रतिनिधी)
मजुराच्या खुनातील दोघांना जन्मठेप
By admin | Updated: May 4, 2017 00:19 IST