विद्यापीठाच्या तक्रार निवारण समितीचा निर्णय : बाबासाहेब नंदूरकर शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे प्रकरणयवतमाळ : येथील डॉ. बाबासाहेब नंदूरकर बीपीएड महाविद्यालयातील प्राध्यापकांना विद्यापीठाच्या तक्रार निवार समितीने दिलासा दिला असून प्राध्यापकांना पूर्ण पगार द्या अन्यथा महाविद्यालय दुसऱ्या संस्थेला चालविण्यास द्या, असा आदेश दिला. मात्र या आदेशाची अंमलबजावणी सहजासहजी होईल असे बीपीएड महाविद्यालयाची स्थिती पाहता सध्यातरी शक्य दिसत नाही. येथील डॉ. बाबासाहेब नंदूरकर बीपीएड महाविद्यालयातील प्राध्यापकांनी व्यवस्थापनाविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली. त्यात विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सुधारित वेतनश्रेणी प्रमाणे पूर्ण वेतनाची मागणी केली. या याचिकेवर उच्च न्यायलयाने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाला या संदर्भात निर्णय घेऊन अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार अमरावती विद्यापीठाने तक्रार निवारण समिती स्थापन केली. प्र-कुलगुरु जयकुमार तिडके यांच्या अध्यक्षतेत समिती गठीत केली. या समितीने निर्णय देत सहाय्यक प्राध्यापकासाठी सहाव्या वेतन आयोगात पूर्ण वेतन अदा करण्यात यावे, प्राध्यापकांच्या सेवाज्येष्ठतेनुसार स्थाननिश्चिती व वेतन निश्चिती करण्यात यावी, नियुक्ती तारखेपासून आजपर्यंत वेतनातील फरकाची थकित रक्कम शासकीय नियमानुसार देण्यात यावी अशा सूचना केल्या. तसेच या सूचना संस्थेला मान्य नसेल तर सदर महाविद्यालय प्राध्यापकांना चालविण्यास देण्यात यावे किंवा दुसऱ्या संस्थेला चालविण्यास नियमाप्रमाणे कार्यवाही करावी असे आदेश देण्यात आले. मात्र या शिफारसी खासगी विना अनुदानित बीपीएड महाविद्यालय पूर्ण करेलच याची कोणतीच खात्री दिसत नाही. गत दोन वर्षांपासून बीपीएडला एकही प्रवेश नाही. त्यामुळे एखादी दुसरी संस्था महाविद्यालय चालविण्यास घेण्याची सूतराम शक्यता नाही. तर प्राध्यापकांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करता तेही महाविद्यालय चालवू शकत नाही. (नगर प्रतिनिधी)
वेतनासाठी संस्था दुसऱ्याला चालविण्यास द्या
By admin | Updated: November 10, 2015 03:15 IST