यवतमाळ : अडीच कोटींच्या कंत्राटाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी गुरुवारी बोलाविण्यात आलेल्या यवतमाळ नगरपरिषदेच्या विशेष सर्वसाधारण सभेकडे नगरसेवकांनी पाठ फिरविली. अखेर गणपूर्तीअभावी ही सभा रद्द करावी लागली. नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा बुधवारी पार पडली. त्यात अडीच कोटींच्या साफसफाई कंत्राटाचा विषय चर्चिला गेला. मात्र याच विषयावर ही सभा हिंसक वळणावर पोहोचली. प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. त्यात बुधवारी न्यायालयाची तारीख होती. त्यात नेमका काय निर्णय होतो याकडे लक्ष लागले होते. म्हणून गुरुवारी विशेष सर्वसाधारण सभा बोलविली गेली. मात्र आज प्रत्यक्षात या सभेला केवळ चार सदस्य उपस्थित होते. बहुतांश सदस्यांनी या सभेकडे पाठ फिरविल्याने ही सभा बोलाविण्यासाठी आग्रही असलेले नगरपरिषदेचे पदाधिकारी तोंडघशी पडले. अडीच कोटींचा सफाई कंत्राट हा नगरपरिषदेतील अनेक घटकांसाठी जिव्हाळ्याचा विषय ठरला आहे. या कंत्राटावर अनेकांची ‘दुकानदारी’ चालते. सत्ताधारी पक्षाला हा कंत्राट रद्द करायचा आहे. तर काही सदस्य कंत्राटदारासाठी सभागृहात युक्तीवाद करताना दिसतात. यावरून सफाई कंत्राटाशी असलेली जवळीक उघड होते. नगरपरिषद क्षेत्रातील साफसफाईसाठी कंत्राटदाराला महिन्याकाठी २० ते २२ लाख रुपये दिले जातात. वर्षाचे हे बजेट अडीच कोटी रुपयांचे आहे. एवढा पैसा देऊनही यवतमाळ शहरातील घाणीचे साम्राज्य आणि साफसफाईची समस्या कायम असल्याची ओरड नागरिकांमधून ऐकायला मिळते. (कार्यालय प्रतिनिधी)
विशेष सभेकडे नगरसेवकांची पाठ
By admin | Updated: December 4, 2014 23:16 IST