अधिकाऱ्यांची खरडपट्टी : ९० टक्के गावे पाणी टंचाईमुक्त, मुकुटबनची समस्या कायमचमुकुटबन : उन्हाळ्यात पाणी टंचाई भासू नये, यासाठीच पूर्व नियोजन करण्यासाठी शुक्रवारी झरी पंचायत समिती सभागृहात आमदारांनी पाणी टंचाई आढावा बैठक घेतली.आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार अध्यक्षस्थानी होते. जिल्हा परिषद सदस्य प्रकाश कासावार, पंचायत समिती सभापती मिथुन सोयाम, पंचायत समिती सदस्य शीतल पंधरे, गटविकास अधिकारी बी.एम. मेघावत, तहसीलदार अशोक देवकर, अनिल पावडे, प्रवीण विधाते, सरपंच शंकर लाकडे, सहायक गटविकास अधिकारी उदयसिंह राजपूत बैठक्ीला उपस्थित होते. प्रथम मुकुटबनचा पाणी प्रश्न हाताळण्यात आला. येथे पाच वर्षांपासून भारत निर्माण प्रकल्प रखडलेला आहे. सध्या ग्रामस्थ फ्लोराईड युक्त पाणी पीत असल्यामुळे विविध आजारांचा सामना करावा लागतो. याबाबत वरिष्ठांना विचारपूस केल्यास ते कानाडोळा करतात, असे सरपंच लाकडे यांनी सांगितले. संबंधित अधिकाऱ्यांना सभेतूनच फोन करून विचारले असता, निधी आहे पण कामात संथगती असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे आमदार भडकले. त्यांनी येत्या २६ जानेवारीपर्यंत प्रकल्प सुरू करण्याचे आदेश दिले. यानंतर झरी तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतीच्या सरपंच, सचिवांनी समस्या मांडल्या. त्यात जवळपास ९० टक्के गावे पाणी टंचाईपासून मुक्त असल्याचे आढळले. काही ठिकाणी विहिरी आहे, मात्र मोटार व केबलमुळे प्रकल्प रखडले आहे. याबाबत महावितरणचे मानकर यांनी लक्ष देऊन रखडलेली कामे पूर्ण करण्याचे आमदारांनी सुचविले. उर्वरित १० टक्के गावात राजूर, हिरापूर (नवीन), मूळगव्हाण, माथार्जून, मार्की, मुकुटबन, येदलापूर, धानोरा, दिग्रस येथील सरपंचांनी पाणी समस्या मांडल्या. पुढील बैठकीपूर्वी त्यांचे निरसन करण्यात येणार असल्याचे आमदारांनी सांगितले. पाणी पुरवठा विभागाचे जयस्वाल यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाल्यामुळे आमदारांनी त्यांना चांगलेच खडसावले. (शहर प्रतिनिधी)केवळ बैठकच, अंमलबजावणी शून्ययेदलापूर येथील दयाकर गेडाम यांनी गावातील पाणी समस्येचा प्रश्न मांडला. सुरूवातीला ४० लाख रूपये मंजूर झाले. थातुरमाथूर काम झाले. मात्र गावात पाणी पोहोचले नाही. नेमके पाणी मुरले कुठे, असा प्रश्न त्यांनी केला. केवळ नेहमी बैठक होते. मात्र अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप त्यांनी केला. मांडवी येथे चार हातपंप असून दोन बंद आहे. शेतकऱ्यांनी बोअरवेल मारल्यामुळे गावातील दोन हातपंप बंद झाल्याचा आरोप उपसरपंच राजू गोंड्रावार यांनी केला.
आमदारांनी घेतली आढावा बैठक
By admin | Updated: December 6, 2015 02:25 IST